

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा गत अडीच महिन्यांपासून सीमाभागात धुमाकूळ घालणारा चाळोबा गणेश हत्ती अखेर (रविवार) रोजी मध्यरात्रीनंतर आजरा (जि. कोल्हापूर) येथील चाळोबा जंगलात परतला. यामुळे सीमाभागातील शेतकऱ्यांसह बेळगाव वनाखात्याच्या अधिकाऱ्यांनी निश्वास टाकला. सीमाभागात या हत्तीने तब्बल 79 दिवसांचा मुक्काम ठोकल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेकडो वर्षापासून दांडेली जंगलात वास्तव्याला असणारे हत्ती गत वीस वर्षांपूर्वी चंदगड मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश करून दूरवर विसावले आहेत. आजरा येथे गत अनेक वर्षांपासून स्थिरावलेल्या सदर हत्तीचे 23 फेब्रुवारी रोजी आजरा येथून गडहिंग्लज, चंदगड व हुक्केरी तालुक्याच्या सीमेवरून चिंचणे जंगलात आगमन झाले. यानंतर त्या हत्तीने थेट बेळगाव तालुक्याच्या सीमेवर येऊन बेळगाव शहराजवळ फेरफटका मारला होता. सदर हत्तीने मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात मोठी दहशत निर्माण केली होती.
बेळगाव तालुक्याच्या सीमेवरील अनेक गावांमध्ये हत्तीकडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात सदर हत्ती हा महिपाळगडाच्या जंगलात स्थिरावला होता. या दरम्यान त्याने बेळगाव तालुक्यातील अलतगा, कंग्राळी, बेकिनकेरे येथे धुमाकूळ घालून अनेक दुचाकींचे नुकसान केले आहे. या दरम्यान तीन ट्रॅक्टर, दोन रोटरचे देखील नुकसान केले आहे. त्याने बैलगाडीही भिरकावून दिली होती. त्याशिवाय अनेक शेतकऱ्यांच्या भात पिकाचे, ऊस पिकांचे नुकसान केले आहे. बेकिनकेरे येथे त्या हत्तीने मानवी वस्ती मध्ये प्रवेश करून धांन्याचे नुकसान केले आहे. सदर हत्ती आल्या मार्गाने आजरा तालुक्याची चाळोबा जंगलात विसावला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांतून सुटकेचा नि:स्वास टाकला आहे.
रविवारी आजरा तालुक्यातील मासोली येथील जंगला शेजारी असणाऱ्या तानाजी तेजम यांच्या रस्त्याशेजारी लावलेल्या ट्रॅक्टरची मोडतोड करून सुमारे लाख रुपयांचे नुकसान केले आहे. गत अडीच महिन्यांमध्ये बेळगाव व चंदगड तालुक्यात लाखो रुपयांचे पिकांचे नुकसान या हत्तीने केले आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटक वन खात्याने पंचनामे करून नुकसान मदत मिळवून देण्याचे अहवाल तयार केले आहेत. त्याची कार्यवाही सुरू आहे.
मात्र सीमाभागात हत्तीला अनुकूल असणारी नैसर्गिक स्थिती असल्याने हत्तीचे पुन्हा केंव्हाही आगमन होऊ शकते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र व वनखात्याने केले आहे.
हेही वाचा :