बालविवाह प्रतिबंध अभियान : बालविवाह रोखणे सर्वांचीच जबाबदारी ; जिल्हाधिकारी हिरेमठ

बालविवाह प्रतिबंध अभियान : बालविवाह रोखणे सर्वांचीच जबाबदारी ; जिल्हाधिकारी हिरेमठ

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
बालविवाह रोखणे ही सर्वांची जबाबदारी असून ती सर्वांनी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला व बाल विकास विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व विविध खात्यांच्या संयुक्‍त विद्यमाने रविवारी जिल्हा पंचायत सभागृहात बालविवाह प्रतिबंध अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी खा. मंगल अंगडी, खा. इरण्णा कडाडी, महिला व बालकल्याण खात्याचे उपसंचालक बसवराज वरवट्टी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी हिरेमठ म्हणाले, बालविवाह रोखणे ही एकाची जबाबदारी नाही. ती सर्वांनी पार पाडली पाहिजे. मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. तेव्हाच त्यांना त्यांच्या हक्‍काची जाणीव होत असते. बालविवाह रोखण्यामध्ये सर्वाधिक आघाडी अथणी आणि खानापूर तालुक्यांनी घेतली आहे. गेल्या वर्षभरात 96 प्रकरणांमध्ये बालविवाह रोखले असून, 12 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खा. कडाडी म्हणाले, स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता सर्व मुलांनी चांगले शिक्षण घेतले पाहिजे. मुलींना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी सक्षम केले पाहिजे. अलीकडच्या काळात बालविवाह कमी झाले आहेत. पण, ग्रामीण भागात वडीलधार्‍यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी बालविवाह केले जात आहेत.

बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सिस्टर लॉर्ड मेरी म्हणाल्या, हिंसा तसेच बालविवाह रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम केले पाहिजे. हिरेमठ यांनी बालविवाह निर्मूलनाची प्रतिज्ञा दिली. यावेळी जनजागृती रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. महिला व बालविकास खात्याचे उपसंचालक बसवराज वरवट्टी यांनी स्वागत केले. यावेळी डीसीपी रवींद्र गडादी, निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पोलिस उपायुक्त एसीपी शरणप्पा, बालकल्याण समितीच्या सदस्या अखिला पठाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर जिल्हा पंचायतीपासून चन्नम्मा चौकापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये लोकप्रतिनिधी, बालविकास नियोजक मल्लाप्पा रोट्टी, रामामूर्ती, समन्वयक, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका आणि विविध शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

व्हिडिओ पाहा : राजर्षी शाहू महाराजांच 'हे' स्वप्न राजाराम महाराजांनी पूर्ण केलं

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news