कर्नाटक : प्रोजेक्टचे स्वप्न बाजूला, भागीदार जेलला; भवानीनगर खूनप्रकरणी सुपारी घेणार्‍या दोघांना अटक

कर्नाटक : प्रोजेक्टचे स्वप्न बाजूला, भागीदार जेलला; भवानीनगर खूनप्रकरणी सुपारी घेणार्‍या दोघांना अटक
Published on
Updated on

कर्नाटक : पुढारी वृत्तसेवा
बांधकाम व्यवसायात रक्कम गुंतवायला लावून दहा वर्षांपासून त्रास देणार्‍या राजूचा काटा काढायचा. त्यामुळे जे हाऊसिंग प्रकल्प सुरू आहेत, ते आपसूकच आपल्याकडे येतील, असा विचार करून दोघा भागीदारांनी व राजूच्या दुसर्‍या पत्नीने सुपारी दिली ती आपले कुठेही नाव येणार नाही, या ठाम विश्‍वासावरच. परंतु, सूत्रधार असलेल्या या तिघांना जेलची हवा खावी लागली आहे. त्याबरोबरच मंगळवारी पोलिसांनी सुपारी घेतलेल्यांपैकी दोघांना अटक केली.

संजय रजपूत (रा. कपिलेश्‍वर पाळी) व विजय जागृत (रा. महाद्वार रोड) अशी मंगळवारी वडगाव पोलिसांनी अटक केलल्या संशयितांची नावे आहेत. यांसह अटकेतील एकूण संशयितांची संख्या पाच झाली आहे, तर आणखी काही जणांचा शोध सुरू आहे.
15 मार्च रोजी राजू मल्लाप्पा दोड्डबोम्मन्नवर (वय 45, मूळ रा. हलगा-बस्तवाड, सध्या संस्कृती पाम्स् मंडोळी रोड, भवानीगर) याचा डोळ्यात मिरचीपूड टाकून खून झाला. खुनाची सुपारी राजूची दुसरी पत्नी किरण (वय 26), राजूचे रिअल इस्टेट व्यवसायातील भागीदार शशिकुमार शंकरगौडा (49, रा. अलारवाड) व धरणेंद्र घंटी (वय 50, रा. हलगा बस्तवाड) यांनी दिल्याचे स्पष्ट झाले. या तिघांना सोमवारी वडगाव पोलिसांनी अटक केली.

सर्व प्रकल्प आपलेच

राजूने दहा वर्षांपूर्वी शशिकुमार व धरणेंद्र यांना आपण स्थापन केलेल्या ग्लोबल डेव्हलपर्स कंपनीमध्ये रक्कम गुंतवायला लावली होती. परंतु, दहा वषार्र्ंत प्रकल्प पूर्ण झालाच नाही. मात्र त्यासाठी उपरोक्त दोघांनी बँकेतून कर्ज घेतले होते.
ती रक्कमही दुप्पट झाली होती. त्यामुळे हे दोघे भागीदार वैतागले होते. शिवाय या दोन भागीदारांच्या माघारीही राजूने पाच ते सहा ठिकाणी आपले बांधकाम प्रकल्प सुरू केले होते. तिघांचा संयुक्त प्रकल्प अर्धवट सोडून राजू इतर प्रकल्पांमध्ये पैसा गुंतवत असल्याचा रागही भागीदारांना होता. यालाच संपवले तर त्याचे सर्व प्रकल्प आपल्याला मिळतील, ते पूर्ण करून आपण यातून बक्कळ पैसा कमवू, असे या भागीदारांना वाटले. यामध्ये त्यांनी राजूची दुसरी पत्नी किरणलाही सामावून घेतले. खुनाची सुपारी दिली तर आपली नावे बाहेर पडणार नाहीत, असा विश्‍वास या तिघांना होता. परंतु, पोलिसांनी खुनाच्या मुळापर्यंत जाऊन आधी सूत्रधारांनाच अटक केली.

सुपारी घेणार्‍या दोघांना अटक

तिघा सूत्रधारांनी संजय रजपूत याची शहरातील एका नामांकीत हॉटेलमध्ये भेट घेतली. त्याला दहा लाखांची सुपारी दिली. संजयने ही जबाबदारी विजय जागृत या तरुणावर सोपवली. त्याने विशाल नामक तरुणाला 5 लाख रू. देण्याचे कबूल करुन त्याला राजूचा खून करण्यास सांगितले. मंगळवारी वडगाव पोलिसांनी संजय व विजय या दोघांना अटक केली. उर्वरित संशयित फरारी असून त्यांचा शोध सुरू आहे.

भांडण काढत केला खून

हॉस्पिटलमध्ये असलेल्या तिसर्‍या पत्नीला भेटण्यासाठी राजू पहाटे 5.45 वा. बाहेर पडला होता. यावेळी ठरल्याप्रमाणे पाळतीवर असलेले तीन खुनी दबा धरून बसले होते. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी जाणीवपूर्वक राजूच्या कारला दुचाकी धडकवली. कारची काच खाली घेत राजूने त्यांच्याशी वाद घातला. तिघांनीही भांडण काढल्याने राजू खाली उतरला व दोघांपैकी एकाच्या कानशीलात लगावली. यावेळी या तिघांपैकी एकट्याने सोबत आणलेली मिरचीपूड राजूच्या डोळ्यात टाकली व चाकूने वार केले. यामध्ये राजूचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचलत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news