सातारा : जिल्ह्यातील महामार्गाची कामे तातडीने मार्गी लावा ; खा.श्रीनिवास पाटील | पुढारी

सातारा : जिल्ह्यातील महामार्गाची कामे तातडीने मार्गी लावा ; खा.श्रीनिवास पाटील

मारूल हवेली (सातारा): पुढारी वृत्तसेवा
लोकसभेत खा.श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा एकदा आवाज उठवत सातारा जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गच्या प्रलंबित कामांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. पाटण, कराड येथील पुलांची कामे लवकर पूर्ण करावीत, आणेवाडी, खेडशिवापूर टोलनाका परिसरातील स्थानिकांना टोलमध्ये सवलत द्यावी, वेळे येथे रस्ता ओलंडण्यासाठी नवीन पूल बांधावा, महामार्गावरील बंद असलेले पथदिवे सुरू करावेत तसेच मार्गाच्या कामाचा दर्जा सुधारावा यासह अन्य मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

लोकसभेत सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाच्या नियंत्रणातील अनुदान मागणी चर्चेवेळी बोलताना खा.पाटील यांनी या मागण्या केल्या. ते म्हणाले, पाटण शहराजवळील केरा नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे काम अपूर्ण अवस्थेत असून ते काम लवकर पूर्ण व्हावे करण्यात यावे. विजापूर ते गुहागर मार्गावरील कराड शहराजवळ कृष्णा नदीवर असणार्‍या पुलाचे काम देखील दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. मात्र ते काम अद्याप अपूर्ण असून त्या कामाला गती द्यावी. टोलनाक्याच्या 20 कि.मी. अंतरामधील नागरिकांना टोलची सवलत मिळावी. तेथील स्थानिक रहिवाशी, व्यापार्‍यांना ये-जा करण्यासाठी पास दिले जातात. परंतु ती सुविधा काही लोकांनाच मिळते. कित्येकजण त्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे संबंधित प्रत्येक व्यक्तीला सवलतीचा लाभ मिळण्यासाठी अशी एखादी व्यवस्था निर्माण करावी, जेणे करून त्याची सुविधा त्यांना घेता येईल.

महामार्गाच्या सुधारीत कामामुळे रस्त्याची उंची वाढत असून दुतर्फा असलेल्या जमिनीची पातळी खाली राहत आहे. परिणामी पावसाळ्यात पडणारे पाणी रस्त्यांच्या गटारात न जाता ते बाजूच्या शेतामध्ये साचून राहत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व रहिवासी नागरिकांना अडचणी निर्माण होत असून शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्या पाण्याचा योग्य निचरा होण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असल्याचे खा. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

टोलनाक्यावर सुधारित यंत्रणा बसवा

खेडशिवापूर, आणेवाडी टोलनाक्यावर सतत कोंडी होत असल्याने महामार्गावर लांबचलांब रांगा लागत आहेत. टोलनाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी त्याठिकाणी सुधारित यंत्रणा बसवून सुविधा निर्माण करावी म्हणजे प्रवाशांची गैरसोय होणार नाही याकडे खा. श्रीनिवास पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Back to top button