Waterfall Entry Ban | वर्षा पर्यटनाच्या आनंदावर पाणी, धबधब्यांवरील प्रवेशबंदीमुळे पर्यटकांचा हिरमोड

पश्चिम भागातील हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायालाही फटका
चिखलेः सवतुरा धबधब्याची पाहणी करताना मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण, उपवनसंरक्षक क्रांती एन. ई., एसीएफ बसवराज बाळद.
चिखलेः सवतुरा धबधब्याची पाहणी करताना मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण, उपवनसंरक्षक क्रांती एन. ई., एसीएफ बसवराज बाळद.
Published on
Updated on

खानापूर : वासुदेव चौगुले

पावसाळा सुरू होताच निसर्गसौंदर्यान नटलेल्या खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. कणकुंबी, चिखले, चिगुळे, पारवाडसह परिसरातील वर्षा पर्यटनस्थळांवर दरवर्षी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हा प्रशासनाने या धबधब्यांवर पर्यटकांच्या प्रवेशास बंदी घातल्याने वर्षा पर्यटनाच्या आनंदावर अक्षरशः पाणी पडले आहे. बंदीमुळे पर्यटकांसह स्थानिक व्यावसायिकांचाही हिरमोड झाला आहे.

पावसाळ्यात कमी खर्चात निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कणकुंबी परिसराची स्वतंत्र ओळख आहे. बेळगावसह सीमाभागातील हजारो पर्यटक या परिसराला पसंती देतात. मात्र, यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वनाधिकाऱ्यांनी धबधबा परिसरात प्रवेशबंदी लागू करून कड़क बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने जगप्रसिद्ध दूधसागर थबथबा परिसरात रेल्वेमार्गाने उतरणे व

फिरण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे, वर्षा पर्यटनासाठी उपलब्ध पर्याय कमी झाले आहेत. गोव्यातील सुरल धबधब्यात बुडून बेळगावच्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गोव्यातच आणखी एका दुर्घटनेत एका युवकाला जीव गमवावा लागला. पर्यटनासाठी विनापरवाना देणारे अनेक तरुण जंगलात वाट चुकून भरकटतात. त्यांच्या शोधासाठी वनखात्याला मोठे परिश्रम घ्यावे लागतात. या घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वनखात्याने खानापूर तालुक्यातील आठ वर्षा पर्यटन केंद्रांवर प्रवेशबंदी लागू केली.

चिखलेः सवतुरा धबधब्याची पाहणी करताना मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण, उपवनसंरक्षक क्रांती एन. ई., एसीएफ बसवराज बाळद.
Chief Minister D. K. Shivakumar | म्हादईसह प्रलंबित प्रकल्पांसाठी जोर लावणार : मुख्यमंत्री शिवकुमार

पश्चिम भागातील धबधब्यांवर बंदी आल्यामुळे वर्षा पर्यटनासाठी आता आंबोली हा एक प्रमुख पर्याय शिल्लक राहिला आहे. मात्र, प्रत्येकालाच आंबोलीला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे, स्थानिक पर्यटक कणकुंबी, चिखले, चिगुळे आणि पारवाड येथील धबधब्यांना भेट देत असतात. यंदा या पर्यटनस्थळांवर नेहमीची गर्दी दिसण्याऐवजी शुकशुकाटाचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, पर्यटनबंदीचा फटका पश्चिम भागातील स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बसू, लागला आहे. जांबोटी चोर्ला मार्ग विकसित झाल्यानंतर जांबोटी ते कणकुंबीदरम्यान मोठ्या प्रमाणात हॉटेल, रेस्टॉरंट व लहान व्यावसाय उभे राहिले आहेत. पावसाळ्यातील दोन महिन्यांच्या पर्यटन हंगामावर त्यांची मोठी आर्थिक मिस्त असते. मात्र, सरसकट बंदीमुळे पर्यटकांनी या भागाकडे पाठ फिरविल्याने व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

चिखले पारवाड येथील सवतुरा धबधब्यावर वनखात्याने संरक्षक ग्रील उभारली आहे. तसेच या ठिकाणी रस्ता आणि पुलाचा अभाव असल्याने चारचाकी वाहने थेट धबधब्यापर्यंत पोचत नाहीत. पर्यटकांना दोन ते तीन किलोमीटर पायी चालत जावे लागते. त्यामुळे, वाहनांची गर्दी, गोंगाट किंवा मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार घडण्याची शक्यता कमी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही मोजके पर्यटक दारू पिऊन गैरवर्तन करतात. मात्र त्याची शिक्षा सर्वसामान्य निसर्गप्रेमी पर्यटकांना मिळत असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. पर्यटनस्थळांवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना, प्रशिक्षित गाईड, मर्यादित प्रवेश आणि कडक नियंत्रण ठेवून पर्यटनाला परवानगी देणे शक्य आहे. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षितताही राखली जाईल आणि स्थानिकांचा रोजगारही टिकून राहील.

मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण आणि उपवनसंरक्षक क्रांती एन. ई. यांनी नुकतीच चिखले धबधबा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आहे. पर्यटकांना सुरक्षितपणे प्रवेश देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वनखात्याचे प्रशिक्षित गाईड सोबत पाठवून पर्यटकांना विखले धबधब्यावर पर्यटनाची परवानगी देण्याचा विचार सुरु आहे. त्याचे व्यवस्थापन ग्राम वन समितीकडे सोपविण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे.

- बसवराज वाळद, एसीएफ, खानापूर

चिखलेः सवतुरा धबधब्याची पाहणी करताना मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चव्हाण, उपवनसंरक्षक क्रांती एन. ई., एसीएफ बसवराज बाळद.
Karnataka Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तार उद्या की परवा?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news