

बेळगाव : बेळगाव नगरविकास प्राधिकरणाने (बुडा) अजब कारभार केला असून दीड किलोमीटर लांबीच्या पादचारी मार्गावर तब्बल 450 दिवे उभारले आहेत. त्यामुळे, शहराचे नियोजन बघणाऱ्या प्राधिकरणाच्या बुडाखालीच अंधार असल्याचे दिसून येत आहे.
गणेश सर्कल ते रामतीर्थनगर याठिकाणी बुडाने पदपथावर दिवे लावले आहेत. पथदीपांचे खांब अवघ्या 10 फूट अंतरावर उभे केले आहेत. परिसरातील लोकांनी बुडाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी आधी झाडे लावण्यात आली होती. ती नंतर काढण्यात आली. त्यानंतर पथदीपांचे खांब उभारण्यात आले.
अखेरीस सगळे तसेच सोडून देण्यात आले. नियोजनाच्या नावाखाली झालेल्या या प्रकारामुळे निधी वाया गेला आहे. शिवाय त्या परिसराचे सौंदर्य नष्ट झाले आहे, असेही नागरिकांतून सांगण्यात आले.
पथदीपांच्या या खांबांमुळे तेथील हिरवळ हरपली आहे. परिसराचे सौंदर्य नष्ट झाले आहे. याठिकाणी पथदीपांचे खांब उभारून अनेक दिवस लोटले आहेत. मात्र, त्यातील एकही दिवा पेटलेला नाही, असेही लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पथदीप कशासाठी उभारण्यात आले आहेत, असा प्रश्न लोकांना पडला आहे.