

बेळगाव ः पंधरा वर्षांपूर्वी न्यायाधिशांच्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून जखमी केले. त्यानंतर त्यांनी शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या आणि जिल्हा प्रशासन जागे झाले. आता गेल्या पाच महिन्यांत तीन ठिकाणी लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी जीवघेणे हल्ले केले आहेत. पण, प्रशासनाकडून ठोस उपाय योजना नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतरच जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
जोशी मळा, खासबाग येथे एका मुलीच्या अंगावर सात भटकी कुत्री धावून जात असलेला व्हीडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. 31 डिसेंबर रोजीचा हा व्हीडीओ असला तरी खासबागमधील परिस्थितीत बदल झालेला नाही. दर पंधरा दिवसाला भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी होतानाच्या घटना घडत आहेत. विशेषतः लहान मुले, महिला आणि वृद्धांवर भटकी कुत्री हल्ले करत आहेत. या कुत्र्यांबाबत महापालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही त्यावर कोणताही उपाय आखण्यात आलेला नाही. नसबंदी केंद्रही बंद पडले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशत प्रचंड वाढली आहे.
महापालिकेने जागतिक रेबिज दिनानिमित्त पशुवैद्यकीय खात्याच्या मदतीने शहरातील भटक्या कुत्र्यांना रेबीज लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला काही दिवस ही मोहीम राबवण्यात आली. पण, ती पूर्ण होण्याआधीच थांबवण्यात आली. महापालिकेच्या नसबंदी केंद्रात अपुरी जागा आहे. मनुष्यबळही कमी आहे. त्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. महापालिकेचे अधिकारी शहरातील मांस विक्री दुकाने, हॉटेल्स, रस्त्यात खाऊ घालणाऱ्यांमुळे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे, असे सांगून आपली जबाबदारी टाळत आहे.
गेल्या काही महिन्यांत मारुतीनगर, शहापूर, इंद्रप्रस्थनगर, गांधीनगर, आझाद नगर याठिकाणी भटक्या कुत्र्यांचे मोठे हल्ले झाले आहेत. भटक्या कुत्र्यांसाठी शेड उभारणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हिरेबागेवाडी येथे दोन एकर जागेत शेड आणि नसबंदी केंद्र उभारणी सुरू केली आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडे सक्षम यंत्रणाच नसल्यामुळे शहरातील अनेक भाग दहशतीखाली आले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतरच हे प्रकरण गांभीर्याने घेणार का, असा सवाल करण्यात येत आहे.
अंगावर काटा आणणारा व्हीडीओ
जोशी मळा, खासबाग येथे एका शाळकरी मुलीच्या अंगावर सात भटकी कुत्री धावून जात असल्याचा व्हीडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. अंगावर काटा येणाऱ्या या व्हीडीओत कुत्र्यांना घाबरून मुलगी खाली पडल्याचे दिसून येते.