

निपाणी : येथील हायटेक बसस्थानक आवारात असलेल्या स्वच्छतागृहात महिला प्रवाशांकडून 5 ते 10 रुपये आकारणी केली जात आहे. याबाबत येथील 4 जे आर मानवाधिकार संघटनेने परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच आगार प्रमुखांना निवेदन दिले असल्याची माहिती अशोक खांडेकर यांनी दिली.
निपाणी बसस्थानकामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील प्रवाशांची ये-जा असते. शहर परिसरातील अनेक नोकरदार, कामगार, व्यावसायिक आणि प्रवासी कामाच्या निमित्ताने रोज बेळगाव, कोल्हापूर व इतर ठिकाणी ये-जा करतात. त्यांच्यासाठी आमदार फंडातून या स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु येथील कंत्राटदार स्वच्छतागृहाचा वापर करणाऱ्या नागरिकांकडून मनमानी आकारणी करत आहेत.
बाहेर एक रुपये आकारणी असा बोर्ड असतानादेखील 5 ते 10 रुपये आकारले जातात. काही नागरिक स्थानकात दुचाकी वाहने पार्किंग करून सायंकाळी घेऊन जातात. तर काही प्रवासी सार्वजनिक स्वच्छतागृह व इतर ठिकाणी वाहने पार्किंग करत आहेत. स्थानक परिसरात नो पार्किंगमध्ये वाहने पार्किंग केल्यास 200 रुपयांचा दंड आहे. हा नियम धाब्यावर बसवून बिनधास्त पार्किंग केले जात आहे. तर बस स्थानकात ‘पे पार्किंग’च्या नावाखाली रक्कमही वसुली केली जात आहे.
पॅचवर्ककडे दुर्लक्ष
महिला आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहासाठी 1 रुपये शुल्क असताना कंत्राटदार व तेथील कर्मचारी महिलांकडून 5 तर पुरुषाकडून 10 रुपये वसूल करत आहेत. याबाबत आगारातील अधिकाऱ्यांशी मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून पत्रही दिले आहे. पण, यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात असल्याचे मानवाधिकार संघटनेचे सदस्य अशोक खांडेकर यांनी सांगितले. निपाणी बसस्थानकात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे पॅचवर्क करण्याकडे आगाराचे दुर्लक्ष आहे.