निपाणी : पुढारी वृत्तसेवा; निपाणी परिसराला लागून असलेल्या कागल, गडहिंग्लज आजरा, चंदगड भागातील गावांत यात्रांचा हंगाम सुरू असल्याने बकरी बाजारात उलाढाल वाढली आहे. मागील आठवडी बाजारपेक्षा दि. 17 रोजी भरलेल्या बाजारात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. सीमाभागातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून निपाणीची ओळख आहे. त्यामुळे बकरी बाजारात गेल्या आठवड्यापासून खरेदी-विक्रीसाठी गर्दी होत आहे. गुरुवारी जवळपास कोट्यवधींची उलाढाल झाली.
सीमाभागात विशाळी अमावस्या झाल्यानंतर ग्रामीण भागातील यात्रांना प्रारंभ होतो. मात्र, सलग दोन वर्षे कोरोना महामारीमुळे यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे निपाणी बकरी बाजारातील उलाढाल मंदावली होती. कोरोना रुग्णसंख्या घटल्याने प्रशासनाने यात्रांना परवानगी दिली आहे.
निपाणीच्या बाजारात कोल्हापूर, बेळगाव, अथणी, रायबाग, चिकोडी या भागातून व्यापारी मोठ्या संख्येने येत असतात. पाच ते सहा गावांतील यात्रा एकाचवेळी होणार असल्यामुळे बकरी खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली होती. सकाळपासूनच व्यापार्यांसह ग्रामीण भागातील नागरिक बकरी घेऊन बाजारात दाखल झाले होते.
विक्रेत्यांच्या तुलनेत खरेदीदारांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे बाजारात दर वधारले होते. कोरोना महामारीमुळे निपाणी बाजारपेठेत उलढाल थंडावली होती. मात्रा, आता यात्रांचा हंगाम पुन्हा सुरू झाल्यामुळे उलाढाल वाढत आहे.
हेही वाचलंत का?