

बंगळूर : चालू शैक्षणिक वर्षात 34 हजार प्राथमिक आणि 9,499 माध्यमिक शाळांमध्ये अतिथी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. राज्यात 50 हजार शिक्षकांची कमतरता असल्याने लवकरच शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे उच्च शिक्षण मंत्री एम. सी. सुधाकर यांनी सांगितले.
गुरुवारी (दि. 14) अधिवेशनादरम्यान भाजप आमदार के. गोपालय्या यांच्या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांच्या वतीने सुधाकर बोलत होते. ते म्हणाले, पहिली ते पाचवीच्या शाळांमध्ये 30 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक नियुक्त करण्यात येतो. हायस्कूलमध्ये एका विभागात 70 विद्यार्थ्यांसाठी 7 शिक्षक नियुक्त केले जातात, त्यानुसार नियुक्ती केली जाणार आहे.
शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांची पुनर्नियुक्ती केली जाईल. शिक्षकांची कमतरता असलेल्या शाळांमध्ये अतिथी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभ्यासक्रम विस्कळीत होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहेत. राज्यात 25 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 10 हजार शाळा आहेत. शाळांमधील पटसंख्येनुसार माध्यान्ह आहार दिला जात आहे, अशी माहितीही मंत्र्यांनी दिली.
आमदार गोपालय्या यांनी सांगितले की, शिक्षकांशिवाय दर्जेदार शिक्षण कसे शक्य आहे? कोणत्याही अनुदानाशिवाय उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि उच्च वर्गखोल्या असलेल्या शाळा बांधल्या गेल्या आहेत. अतिथी शिक्षकांना दरमहा योग्य पगार देण्यात यावा, एलकेजी-यूकेजीमधील प्रत्येक शाळेत 150 मुले आहेत. अशा शाळांमध्ये अंगणवाडी सहाय्यिकांची नेमणूक करण्यात यावी.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेलो इंडिया, फिट इंडियाचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनीदेखील खेलो कर्नाटकाचा नारा देत क्रीडा विभागाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र शालेय पातळीवर क्रीडा शिक्षकांची कमतरता आहे. सुमारे 5 हजार क्रीडा शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 2025-26 या शैक्षणिक वर्षातील शाळा पातळीवरील क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. मात्र क्रीडा शिक्षक उपलब्ध नसल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. 2015 पासून राज्यातील बहुतेक शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची नेमणूक करण्यात आलेली नाही. राज्यातील 43 हजार 492 सरकारी प्राथमिक शाळांमध्ये 38 हजार 740 क्रीडा शिक्षकांची कमतरता आहे. तर 4 हजार 696 हायस्कूलमध्ये 568 शारीरिक शिक्षकांची कमतरता आहे.