

बेळगाव : गणेशोत्सवासाठी सर्व प्रकारची परवानगी एकाच छताखाली मिळण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने एक खिडकी सुरू केली आहे. परंतु, ही एक खिडकी फक्त आयुक्तालयात सुरू झाली असून सर्वांना येथे परवानगीसाठी अडचण येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांनी त्यांना हे जाणवून दिल्यानंतर त्यांनी अन्य आठ पोलिस ठाणा हद्दीतही एक खिडकी सुरू करण्याची सूचना केली.
गणेशोत्सव तीन आठवड्यावर येऊन ठेपल्याने पोलिस आयुक्तालयाकडून याची जय्यत तयारी सुरू आहे. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडून पोलिस ठाणेनिहाय बैठका घेऊन याबाबतीत मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांशी चर्चा केली आहे. गणेशोत्सवाबाबत ठाण्यातील अधिकार्यांनाही आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. यावेळी मंडळांनी एक खिडकीची मागणी केली होती. त्याला अनुसरून आयुक्तांनी 1 ऑगस्टपासून एक खिडकी सुरू केली असून तेथील कामकाजालाही प्रारंभ झाला आहे.
तांत्रिक अडचण निदर्शनास
मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सतीश गौरगोंडा, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी आयुक्तालयातील एक खिडकी योजनेचे स्वागत करताना काही तांत्रिक अडचणीदेखील पोलिस आयुक्तांच्या नजरेस आणून दिल्या. सर्वच सार्वजनिक मंडळांनी जर आयुक्तालयातून परवानगी घ्यायची म्हटले तर हे प्रत्यक्षात शक्य होणार नाही. कारण, बेळगाव तालुक्यातील काही गावे, पिरनवाडी, मच्छे, काकतीसह दूरच्या मंडळ पदाधिकार्यांना बेळगावात यावे लागते. हे शक्य नसल्याने पूर्वीसारखे त्या-त्या ठाणा हद्दितही एक खिडकी सुरू झाल्यास मंडळांसाठी सोयीचे होईल, असे सांगितले. हे सर्व ऐकून घेतल्यानंतर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी याचीही अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले. आयुक्तालयात सुरू झालेली एक खिडकी दुपारी 2 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहील. याशिवाय अन्य आठ ठिकाणीही सुरू केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दरवर्षी मंडळांकडून वीज व ध्वनिक्षेपकासाठी अनामत रक्कम भरून घेतली जाते, तीच पद्धत कायम ठेवण्याची विनंतीही मंडळाच्या पदाधिकार्यांनी आयुक्तांना केली. त्याचीही अंमलबजावणी करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. एक खिडकीतील कामकाजाचे पालकत्व सीसीआरबीचे निरीक्षक गुरूराज कल्याणशेट्टी यांच्यावर सोपवली आहे. काहीही अडचण असल्यास त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस आयुक्तालयाने केले आहे.