

पुढारी ऑनलाईन डेस्क : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एका महिलेकडून परदेशी सोन्याच्या विटा जप्त केल्या आहेत. या सोन्याची किंमत सुमारे १२.५६ कोटी रुपये असून, संबंधित महिला ३ मार्च २०२५ रोजी दुबईहून एमिरेट्स विमानाने बंगळूर येथे आली होती.
महिलेची चौकशी केल्यानंतर डीआरआय अधिकाऱ्यांनी तिच्या बंगळुरातील लॅव्हल रोड येथील निवासस्थानी छापा टाकला. यादरम्यान, तेथे २.०६ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची रोकड आढळून आली. संपूर्ण कारवाईत जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत १७.२९ कोटी रुपये इतकी असून, एकूण १४.२ किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडील काळात केलेली सर्वात मोठी मानली जात आहे. संबंधित महिलेविरोधात सीमाशुल्क अधिनियम अंतर्गत कारवाई करत तिला अटक करण्यात आली असून, तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.