

बेळगाव : गावागावामध्ये किराणा दुकानातून दारुची बेकायदा विक्री होत आहे, ती कमी करण्यासाठी आम्ही दारु विक्री दुकानांना परवाने देत आहोत, अशी माहिती अबकारी मंत्री देत असतानाच स्वीगी, झोमॅटोवरुन ड्रगचाही पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेशकुमार यांनी केला.
सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत मंगळवारी (दि. 9) दुसर्या दिवसाच्या पहिल्या प्रहरात प्रश्नोत्तराचा तास झाला. यावेळी निजदचे आमदार सुरेशबाबू यांनी किनारपट्टी भागात किराणा दुकानांतून बेकायदा दारु विक्री होत असल्याचा आरोप करत त्यावर कोणती कारवाई करण्यात आली, असा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नावर बोलताना अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर म्हणाले, किनारपट्टी भागात किराणा दुकानांमध्ये बेकायदा दारु आणि बियरची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, आम्ही या भागात अधिक दारु विक्री परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून राज्याला चांगल्या प्रकारे महसूल मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.
या उत्तरावर भाजप आमदार सुनीलकुमार यांनी आक्षेप घेतला. तुम्हाला दारु विक्रीचे उद्दिष्ट देण्यात येत असते. यंदा तब्बल 40 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे. तुम्ही किराणा दुकानातील बेकायदा दारु विक्रीवर मर्यादा आणू शकता. पण, स्विगी, झोमॅटो आदीवरुन घरपोच दारु विक्री होत असते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का, असे विचारले. हाच मुद्दा पुढे धरत आमदार सुरेशकुमार यांनी स्विगी, झोमॅटोवरुन दारुच नाही तर ड्रगचाही पुरवठा करण्यात येत आहे. याबद्दल सरकारला काहीच गांभीर्य नाही, असा आरोप केला. त्यावर गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी आमच्या सरकारने ड्रगमुक्त कर्नाटक अशीच घोषणा दिली आहे. त्यामुळे तुम्हाला जर ड्रग पुरवठ्याबद्दल काही माहिती असेल तत्काळ सरकारला पुरवावी, असे सांगितले.