

बेळगाव : शेतकऱ्यांचा विरोध डावलून हलगा-मच्छे बायपासच्या कामाला मंगळवारपासून (दि. 9) पुन्हा जोरदार प्रारंभ करण्यात आला आहे. येळ्ळूर रस्त्याकडून कामाला सुरुवात करण्यात आल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बायपासविरोधातील खटला न्यायालयात प्रलंबित असतानाच पुन्हा काम सुरु केल्याने हा न्यायालयाचा अवमान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हलगा-मच्छे बायपासच्या कामाला स्थानिक शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. हा रस्ता सुपीक जमिनीतून केला जात असल्याने शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. त्याऐवजी हा रस्ता पडीक जमिनीतून करावा, अशी त्यांची पहिल्यापासूनची मागणी आहे. त्यासाठी अनेकदा आंदोलने करुनही दडपशाही करत रस्त्याचे काम केले जात आहे. रस्त्यासाठी काढण्यात आलेले नोटिफिकेशन व प्रत्यक्षात होत असलेल्या रस्त्यात तफावत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे झिरो पॉईंटच्या मुद्यावरुन शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची चांगलीच कोंडी केली आहे. न्यायालयानेही झिरो पॉईंट निश्चित करण्याबाबत आदेश दिला होता. मात्र, त्यानंतर अलारवाड क्रॉसवर झिरो पॉईंट असल्याचे सांगत प्राधिकरणाने न्यायालयाची दिशाभूल करुन काम सुरु केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
न्यायालयीन लढा लढण्यासाठी लागणारा खर्च आणि वेळ यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला. पोलिसांच्या दडपशाहीमुळे शेतकरी तणावाखाली आला. या साऱ्याला कंटाळून काही शेतकऱ्यांनी मिळणारी नुकसानभरपाई स्वीकारली. मात्र, अजूनही काही शेतकरी लढा देत आहेत. त्यांचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतानाही आता पुन्हा युद्धपातळीवर काम सुरु केल्याने संताप व्यक्त होत आहे. अनगोळ शिवारात मंगळवारपासून पुन्हा कामाला जोरदार सुरुवात करण्यात आली. माती टाकून रस्ता सपाटीकरण केले जात आहे. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरु असून उर्वरित कामही काही दिवसात पूर्ण करण्याची तयारी कंत्राटदाराने सुरु केली आहे.