

बेळगाव ः बहुचर्चित द्वेषपूर्ण भाषण आणि द्वेषपूर्ण गुन्हे (प्रतिबंध आणि नियंत्रण) विधेयक बुधवारी भाजपच्या गदारोळातच विधानसभेत मांडण्यात आले. बुधवारी तब्बल 13 विधेयके पटलावर सादर झाली असून, गुरुवारपासून त्यांवर चर्चा होणार आहे. भाजपचा सर्वाधिक विरोध द्वेषमूलक भाषण प्रतिबंध विधेयकाला आहे.
विधानसभेत सकाळी प्रश्नोत्तरांचा तास झाल्यानंतर विधेयके मांडण्याची सूचना अध्यक्ष यू. टी. कादर यांनी केली. त्यानुसार सभागृहात तेरा विधेयके मांडण्यात आली. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी कर्नाटक द्वेषपूर्ण भाषण आणि द्वेषपूर्ण गुन्हे प्रतिबंधक आणि नियंत्रण विधेयक मांडले. त्याला भाजप आणि निजदच्या आमदारांनी विरोध केला. तरीही अध्यक्षांनी संख्याबळाच्या मुद्द्यावर ते विधेयक मांडण्याची अनुमती दिली. त्यानंतर कर्नाटक कामगार कल्याण निधी (सुधारणा) विधेयक, 2025 आणि कर्नाटक चित्रपट आणि सांस्कृतिक कामगार (कल्याण प्रोत्साहन) (सुधारणा) विधेयक, 2025 हे कामगार मंत्री संतोष लाड यांनी सादर केले. विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला.
श्री मलई महादेश्वर स्वामी क्षेत्र विकास प्राधिकरण (सुधारणा) विधेयक, कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणग्या (सुधारणा) विधेयक, चंद्रगुट्टी श्री रेणुकाम्बा क्षेत्र विकास प्राधिकरण विधेयक, श्री चामुंडेश्वरी क्षेत्र विकास प्राधिकरण आणि काही इतर कायदे (सुधारणा) विधेयक, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने (कर्नाटक सुधारणा) विधेयक, कर्नाटक भाडे (सुधारणा) विधेयक, कर्नाटक राज्य विद्यापीठे (दुसरी सुधारणा) विधेयक, बाह्यसीमा क्षेत्र विकास मंडळ (सुधारणा) विधेयक, मलनाड क्षेत्र विकास विधेयक कायदा मंत्री एच. के. पाटील यांनी सादर केली.
मौनम् सर्वार्थ साधनम्
एकूण 13 विधेयके सभागृहात मांडली जात असताना अध्यक्ष यू. टी. कादर ‘विधेयक मान्य असणार्यांनी हो म्हणावे’, ‘नसणार्यांनी नाही म्हणावे’, असे सांगत होते. सात-आठ विधेयकांना सत्ताधारी पक्षाच्या कोणीही ‘हो’ म्हटले नाही. त्यामुळे विरोधी पक्षाने ‘सत्ताधार्यांनाच विधेयक मान्य नाही का’, असा सवाल केला. त्यावर अध्यक्षांनी त्रासून काँग्रेस आमदारांना ’तुम्हाला हो म्हणण्यासही त्रास होत आहे का’, असे विचारले. शिवाय मौनम् सर्वार्थ साधनम् असे सांगत मौनातच मंजुरी आहे, असा टोला लगावला.
विधेयकात नेमके काय?
द्वेषपूर्ण भाषण म्हणजे कोणता पूर्वग्रह ठेवून जिवंत किंवा मृत व्यक्ती, वर्ग किंवा व्यक्तींच्या गटाविरुद्ध किंवा समुदायाविरुद्ध असंतोष वाढेल, शत्रुत्व किंवा द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने बोलणे, लिहिणे. यामध्ये धर्म, वर्ण, जात, समुदाय, लिंग, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा, अपंगत्व, जमात 10 घटकांचा समावेश आहे. द्वेषपूर्ण गुन्हा म्हणजे द्वेषपूर्ण भाषण देणे, प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे ज्यामुळे कोणत्याही मृत किंवा जिवंत व्यक्तींच्या गटाविरुद्ध किंवा संघटनेविरुद्ध असंतोष किंवा शत्रुत्वाची भावना निर्माण होईल.
शिक्षा अशी ः द्वेषपूर्ण गुन्हा केल्यास एक ते सात वर्षांपर्यंत कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड असेल. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास दोन ते 10 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांचा दंड असेल.