

बंगळूर : शालेय विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यात विष मिसळणे हे घृणास्पद कृत्य असल्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी म्हटले आहे. बेळगाव जिल्हातील हुलिकट्टी (ता. सौंदत्ती) येथील सरकारी शाळेतील मुख्याध्यापकाची बदली करण्यात यावी, या उद्देशाने शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाण्यात विष मिसळण्यात आले होते. शरणांच्या या राज्यात असे कृत्य करणे बरोबर आहे का, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात सोशल मिडीयाद्वारे आपले मत व्यक्त करताना म्हटले आहे की, या घटनेवर अजूनही माझा विश्वास बसत नाही. धर्माच्या नावावर आपली पोळी भाजून घेऊन राजकरण करणार्या भाजपवाल्यांनी खर्या अर्थाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
हुलीकट्टी गावातील सरकारी शाळेतील मुख्याध्यापक मुस्लिम असल्याने त्याची इतरत्र बदली करण्यात यावी या हेतूने शालेय विद्यार्थ्यांच्या पाण्यात विष घातलेल्या तीनजणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी घडलेल्या या घटनेत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
धार्मिक कट्टरवाद व सांप्रदायिक व्देषामुळे असे प्रकार वाढीस लागले आहेत. दया, प्रेम हे धर्माचे मूळ असणे गरजेचे असल्याची शिकवण देणार्या शरणांच्या भूमीत व्देषाची पातळी खालावू नये असे वाटते. या घटनेची जबाबदारी प्रमोद मुतालिक घेणार आहेत का? तसेच विजयेंद्र किंवा आर. अशोक घेतील का? असा सवालही त्यांनी केला आहे. अशी समाजविघातक कामे करणार्यांच्या पाठीशी राहणारे नेते आता पुढे येतील का? या घडल्या प्रकारचे त्यांनी प्रायश्चित करावे. कट्टरवाद हा नेहमी मानवी समाजासाठी धोकादायक असून व्देषपूर्ण भाषणे व जातीय दंगली रोखण्यासाठी आम्ही विशेष टास्क फोर्स तयार केला असून कायद्याच्या कक्षेत राहून अशा लोकांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
समाजविघातक कृत्य करणार्या समाजकंटकांचा जनतेने प्रतिकार करून तक्रारी दाखल कराव्यात, असे अवाहनही त्यांनी केले आहे. या देशात एकतेचा पुरस्कृत करणारा समाज कट्टरवाद्यांपेक्षा मोठा आहे. या कृत्याचा छडा लावणार्या पोलिसांचे त्यांनी अभिनंदन केले. असे घृणास्पद कृत्य करणार्यांना न्यायव्यवस्था योग्य शिक्षा देईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.