

बेळगाव ः राज्य सरकारने गृहलक्ष्मी नव्हे तर निवडणूक लक्ष्मी योजना लागू केली आहे. मागे लोकसभेच्या वेळी महिलांना पैसे दिले. आता जिल्हा पंचायतीच्या वेळी पैसे देतील. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी धावपळ सुरु असून यातून शेतकरी आणि राज्याच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे, असा घणाघाती आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार बी. वाय. विजयेंद्र यांनी केला. विधिमंडळ अधिवेशनात बुधवारी (दि. 10) उत्तर कर्नाटकावर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना विजयेंद्र यांनी सत्ताधार्यांवर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, उत्तर कर्नाटकाचा विकास झाला तरच राज्याच्या विकासात समतोल येतो. पण, सरकारचे उत्तर कर्नाटकाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे, वेगळ्या उत्तर कर्नाटकाची मागणी काहींकडून केली जातेय. येथील पाणी समस्या, ऊस उत्पादकांच्या समस्या, पर्यटन विकास यावर सरकारने काहीही केले नाही. कावेरीचा मान कृष्णेला मिळवून देण्याची घोषणा करणार्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षाच उत्तर कर्नाटकावर अन्यायच केला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खुर्चीसाठी धावपळ करत आहेत. उत्तर कर्नाटकात झालेल्या अतिवृष्टीकडे कोणाचेच लक्ष नाही. मुख्यमंत्र्यांप्रमाणे इतर मंत्रीही पूरस्थितीची हवाई पाहणी करत आहेत, हा बेजबाबदारपणा वाढला आहे, असे त्यांनी सांगितले. पूरग्रस्तांच्या घरांसाठी येडियुराप्पा मुख्यमंत्री असताना पाच लाख रुपये देत होते. हे सरकार केवळ 95 हजार देत आहे. ऊस उत्पादक आंदोलन करतात, त्याठिकाणी कुणीही मंत्री जात नाही. कारखानदारांची बैठक घेण्यात येत नाही. मका खरेदी केंद्रे सुरु केली नाहीत. तुंगभद्रा जलाशयाच्या 33 दरवाजांची दुरुस्ती झालेली नाही. अलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्यासाठी यांच्याकडे निधीच नाही, असा आरोप विजयेंद्र यांनी केला.