

संबरगी : तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, अशी आख्यायिका पसरवली गेली असली, तरी ती काल्पनिक कथाही खरे मानणारे लोक आहेत. आता तर अनंतपूरमधील एका कुटुंबाने सामूहिक देहत्याग करून वैकुंठाला जाण्याचा संकल्प केला आहे. परिणामी, प्रकरण पोलिसांपर्यंत गेले असून, पोलीस या कुटुंबाची चौकशी करत आहेत.
अनंतपूर-शिंगणापूर रस्त्यावर पाच लोकांचे ईरकर कुटुंब राहते. अनेक वर्षांपासून ते भक्तिमार्गात गुंतले आहे. हे कुटुंब स्वतःला रामपाल महाराजाचे शिष्य म्हणवून घेते. अनंतपूरमध्ये 6 ते 8 सप्टेंबरअखेर विशेष पूजा करून देह परमेश्वराला अर्पण करून वैकुंठवासी होणार आहोत, असे या कुटुंबाने म्हटले आहे. गावातील सर्वांचे देणे पूर्ण करून परमेश्वराकडे जाण्यासाठी रामपाल महाराजांकडून आम्ही दीक्षा घेतली आहे, असे ते सांगतात. तुकाराम ईरकर, पत्नी सावित्री, त्यांचा मुलगा रमेश, सून वैष्णवी आणि नात माया अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यासह पुणे आणि विजापूरमधील त्यांचे नातेवाईक असे एकूण 20 जण परमेश्वराच्या आदेशाने वैकुंठाला जाणार असल्याचे ते म्हणतात.
देहत्याग करताना महाराजाची उपस्थिती असणार आहे. त्यासाठी महाराजाला बसण्यासाठी त्यांनी 14 हजार रुपयांची विशेष खुर्चीही आणली आहे. या सगळ्या प्रकाराबाबत जत पोलिस ठाण्यात तक्रार झाली असून चौकशी सुरू केली आहे. अथणी पोलिसांनीही चौकशी सुरू केली आहे.
वैज्ञानिक युगात लोकांच्या मानसिकतेत बदल अपेक्षित आहे. ज्या महाराजांनी ईरकर कुटुंबाच्या मनात हे भरवले, त्याच्यावर कडक कारवाई करावी.
अॅड. एस. एस. पाटील
पोलिस खाते, आरोग्य खात्याच्या अधिकार्यांसह संयुक्तपणे त्या कुटुंबाची भेट घेऊन चौकशी करू. यामागे कोण आहे, हे तपासून कारवाई करण्यात येईल.
सिद्राय भोसके, तहसीलदार, अथणी