

बेळगाव : सतत दारू पिऊन बहिणीला त्रास देणार्या भाऊजीला मेहुण्याने काठीने मारले. त्या रागातून, ‘तू मला काय मारतोस, मी स्वतःच मरतो थांब’ असे म्हणत भाऊजीने स्वतःचाच गळा विळ्याने कापून घेतला. त्यात तो जागीच गतप्राण झाला.
बेळगाव तालुक्यातील होनीहाळ येथे ही विचित्र घटना घडली आहे. परशुराम मल्लाप्पा कटबुगोळ (रा. होनीहाळ, ता. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. त्याचा मेहुणा मल्लिकार्जुन शंकरेप्पा बडकप्पनवर (वय 23, रा. मुबनूर, ता. सौंदत्ती) याच्यावर मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी की, परशुराम याला प्रचंड दारूचे व्यसन होते. तो कामधंदा न करता फक्त दारू पित होता. यासाठी तो घरातील वस्तू विकणे, पत्नीला मारहाण करून पैसे हिसकावून घेणे असे प्रकार करत होता. गुरुवारी सायंकाळी त्याने घरातील तांदूळ नेऊन तो विकला व आलेल्या पैशातून दारू पिऊन घरी आला. पत्नीसोबत भांडण काढत रात्री तिला जबरदस्त मारहाणही केली.
सततच्या मारहाणीला कंटाळलेल्या बहिणीने आपल्या माहेरी मूबनूरला भावाला फोन केला. याच्यासोबत मला काही राहायचे नाही, मला येथून घेऊन जा, असे तिने सांगितले. त्यामुळे तिचा भाऊ मल्लिकार्जुन शुक्रवारी सकाळी होनीहाळला गेला. याने भाऊजीला जाब विचारला. परंतु, तो सकाळीही नशेत असल्याने वाद घालत होता. त्यामुळे बाजूला पडलेली ढोल बडवण्याची काठी घेऊन त्याने भाऊजीच्या पाठीवर दोन फटके मारले.
त्यामुळे परशुराम चिडला आणि तू मला काय मारतोस, मीच मरतो थांब असे म्हणत घरातील विळा घेऊन स्वतःच्या गळ्यावर ओढला. विळा धारदार असल्याने त्याची श्वसननलिका कापली गेल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला व जागीच मृत पावला. घटनेची माहिती मिळताच मारीहाळचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरील स्थिती पाहता हा खून भासत होता. परंतु, त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली असता भांडणातून मृताने स्वतःवरच वार करून घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी संबंधित मेहुण्यावर मृत्यूस कारणीभूत असा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.