

बेळगाव ः चंदनभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकात प्रथमच चंदनी रंगाच्या बिबट्याची नोंद झाली आहे. विजयनगर जिल्ह्यातील जंगलात हा दुर्मीळ बिबट्या आढळला असून अशा रंगाचा हा देशातील दुसरा बिबट्या ठरला आहे.
होलमट्टी नेचर फाऊंडेशनचे (एचएनएम) संवर्धक संजय गुब्बी आणि त्यांच्या पथकाने कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे 6 ते 7 वर्षे वयाच्या या मादी बिबट्याची नोंद केली. मात्र, या मादीसोबत आढळलेल्या पिलाचा रंग सामान्य असून त्यावर काळे ठिपके आहेत.
बिबट्यांचा रंग सहसा पिवळसर तपकिरी असतो आणि त्यावर काळे ठिपके असतात. परंतु, अपवादात्मक स्वरुपात काळे व चंदनी बिबटे आढळतात. चंदनी बिबट्यात फिकट लालसर-गुलाबी रंगाचे आवरण असते. हे आवरण चंदनाच्या खोडासारखे दिसते. त्यावर काळ्यांऐवजी फिकट तपकिरी ठिपके असतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर या रंगाच्या बिबट्यांना स्ट्रॉबेरी बिबटे म्हणून ओळखले जाते. त्यांची नोंद दक्षिण आफ्रिका आणि टांझानियामध्ये झाली आहे. भारतात चंदनी बिबटे अत्यंत दुर्मीळ आहेत. यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये राजस्थानच्या राणकपूर प्रदेशात अशा रंगाच्या एका बिबट्याची नोंद झाली होती. त्यामुळे, विजयनगरमधील ही नोंद देशातील दुसरी पुष्टी केलेली नोंद आहे, अशी माहिती संशोधक संजय गुब्बी यांनी दिली.
हा रंग हायपोमेलानिझम किंवा एरिथ्रिझमसारख्या स्थितींशी सुसंगत होता. या दोन्ही नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या अनुवांशिक वैशिष्ट्ये आहेत. जी वन्य सस्तन प्राण्यांमध्ये आढळतात. सध्या, हे मूल्यांकन छायाचित्रातील पुरावे आणि दृश्य वैशिष्ट्य्ांवर आधारित आहे.
ही वैशिष्ट्ये विशिष्ट असली तरी अचूक आनुवंशिक यंत्रणेच्या पुष्टीकरणासाठी विष्ठा किंवा केसांसारख्या गैर-आक्रमक नमुन्यांमधून डीएनए वापरुन आण्विक विश्लेषणाची आवश्यकता असेल. असे आनुवंशिक पुरावे उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत या प्राण्याचे वर्णन विशिष्ट आनुवंशिक स्थिती देण्याऐवजी एक दुर्मीळ रंगरुप म्हणून करणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकात 2,500 बिबटे
कल्याण-कर्नाटक प्रदेशात बिबट्यांची संख्या निश्चित करण्यासाठी आणि मोठ्या सस्तन प्राण्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वाचे भूभाग ओळखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून एचएनएमद्वारे कॅमेरा ट्रॅपिंग करण्यात आले. त्यात मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकात अंदाजे 2,500 बिबटे आहेत.