

बेळगाव : भारतीय रेल्वेने मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. ही भाडेवाढ 26 डिसेंबर 2025 पासून लागू केली जाणार आहे. त्यामुळे, रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांना प्रवासासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.
रेल्वेतून 215 किलोमीटरपेक्षा कमी प्रवासासाठी कोणताही अतिरिक्त भार टाकण्यात आलेला नाही. या अंतरासाठी भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही. मात्र, 215 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी ऑर्डिनरी क्लासमध्ये 1 पैसा प्रति किलोमीटर आणि मेल/एक्स्प्रेसच्या नॉन-एसी व एसी क्लाससाठी 2 पैसे प्रति किलोमीटर भाडेवाढ लागू होणार आहे. भारतीय रेल्वेने केलेल्या या भाडेवाढीमुळे रेल्वेच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे. या बदलामुळे सुमारे 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई होण्याची अपेक्षा रेल्वेने व्यक्त केली आहे. तिकीट दरातील या बदलानुसार एखादा प्रवासी 500 किलोमीटरचा प्रवास नॉन-एसी ट्रेनने करत असेल तर त्याला सध्याच्या तिकीट दरापेक्षा 10 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.
बेळगावातून वंदे भारतला 80 टक्के प्रतिसाद
ऑगस्टमध्ये सुरू करण्यात आलेल्या बेळगाव-बंगळूर वंदे भारत (26751/26752) रेल्वेला सुरुवातीला अपेक्षित प्रतिसाद लाभला नव्हता. मात्र, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये वंदे भारतला बेळगावातील प्रवाशानी 80 टक्के प्रतिसाद दिल्याने सध्या ही रेल्वे तेजीत असल्याची माहिती नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने दिली. ऑगस्टमध्ये वंदे भारतला प्रवाशांकडून 68 टक्के प्रतिसाद मिळत होता. हुबळी-पुणे वंदे भारत (20669/20670) प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दोन महिन्यांपूर्वी या रेल्वेला 60 टक्के प्रतिसाद मिळत हेोता. आता 75 टक्के प्रतिसाद मिळत असल्याची माहिती नैऋत्य रेल्वेने दिली आहे.