

मिलिंद कदम
माथेरान ः कर्जत-पनवेल रेल्वे मार्गिका लवकरच सुरू होण्याच्या तयारीत आहे. या मार्गिकेसाठीचा 300 मीटर लांबीच्या नव्या बोगद्याचं काम पूर्ण झाले असून, यामुळे मार्गिकेसाठीचा मोठा टप्पा पार पडला आहे.
मागील कित्येक वर्षांपासून कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाची प्रतिक्षा आहे. अखेर आता कर्जत-पनवेल मार्गावरील उपनगरीय लोकल सेवा लवकरच पूर्ण होणार आहे. कर्जत - पनवेल या मार्गिकेसाठी डोंगर फोडून एक बोगदा उभारण्यात आला आहे. कित्येक दिवस या मार्गाचे काम सुरू होते. आता किरवली-वांजळे गावाजवळील 300 मीटर लांबीचा हा नवा बोगदा आता पूर्ण झाला आहे. या बोगद्यात आता रूळ टाकण्याचे काम बाकी आहे. बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने या मार्गावरील मोठा अडथळा आता दूर झाला आहे.
2005 मध्ये खोदण्यात आलेला जुना हलीवली बोगदा ठिसूळ असल्याने दगड कोसळण्याच्या
घटना घडत होत्या. त्यामुळे हा मार्ग रेल्वे, लोकलसाठी सुरक्षित नव्हता. त्यामुळे मध्य रेल्वेने पनवेल-कर्जत दरम्यान नवीन आणि सुरक्षित मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला. यातून चौक ते कर्जत हा पूर्णपणे नवा मार्ग आणि पनवेल ते चौक हा जुना मार्ग वापरून हा प्रकल्प तयार केला जात आहे.