

बेळगाव : बंगळूरमध्ये ड्रग्जचे तीन कारखाने मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने उद्ध्वस्त केले. यामध्ये 56 कोटी 88 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज व मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी म्हाळेवाडीतील (ता. चंदगड) प्रशांत यल्लाप्पा पाटील (वय 33) याला मुंबईतून आलेल्या विशेष पथकाने अटक केली. त्याला शुक्रवारी पहाटे मुंबई येथे नेण्यात आले. मात्र या दरम्यान प्रशांत याचे वास्तव्य कोठे होते, याची माहिती बेळगाव पोलिसांकडून घेतली जात आहे.
प्रशांत याचे गाव म्हाळेवाडी (ता. चंदगड), मात्र तो गावात आठ दिवसांपूर्वीच आला आहे. त्याचे नातेवाईक कुद्रेमानी गावात असून, मुंबई पोलिस तपासात तो बेळगाव येथे वास्तव्य केल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, बेळगाव पोलिसांनी म्हाळेवाडी येथील ग्रामस्थ तसेच चंदगड पोलिसांना संपर्क साधून, त्याच्या वास्तव्याची माहिती घेतली जात आहे.
मुंबईच्या विशेष पथकाने प्रथम साध्या वेशात गावामध्ये येऊन चौकशी केली. यानंतर गुरुवारी मध्यरात्री या तरुणाला ताब्यात घेतले. प्रशांत हा यात सूत्रधार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचे बीएस्सीपर्यंत शिक्षण झाले असून, तो यापूर्वी रोहा, रायगड येथे एका केमिकल कंपनीमध्ये कार्यरत होता. मात्र, अलीकडे त्याने नोकरीचा राजीनामा दिला. वाशी, मुंबई येथील अब्दुल कादर रशीद शेख, सुरेश रमेश यादव व मालाखान रामलाल बिष्णोई (दोघेही राजस्थान) यांनाही अटक केल्यानंतर प्रशांत याला ताब्यात घेतले.
शेख याच्याकडून दीड किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रशांत याला ताब्यात घेतले. यानंतर त्यांचे कारनामे उघडकीस आले असून, बंगळूर येथील स्पंदना लेआउट, कॉलनी, एनजी गोलाहळी येथे आर. जे. इव्हेंट फॅक्टरी व येरपनाहळी कन्नूर येथील आरसीसी घरात एमडी ड्रग्ज फॅक्टरीवर कारवाई केली. येथून चार किलो एमडी ड्रग्ज व 17 किलो द्रव स्वरूपातील रसायन, यंत्रसामुग्री असा एकूण 55 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील एका पोल्ट्री शेडमध्ये ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला होता. आता दोन वर्षानंतर अशाच प्रकरणामुळे सर्वत्र सीमाभागात खळबळ उडाली आहे.