

बामणोली : सावरी (ता. जावली) गावच्या हद्दीमध्ये सुरू असलेली ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त केल्याचे प्रकरण दिवसेंदिवस क्लिष्ट होत चालले आहे. एकीकडे सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन लेटर बॉम्ब फोडला असताना दुसरीकडे बुधवारी अॅन्टी नार्को टेस्ट टास्क फोर्स कोल्हापूर कृती विभाग पुणेच्या पथकातील पोलिसांनी उद्ध्वस्त ड्रग्ज फॅक्टरीतून आणखी केमिकलयुक्त द्रव पदार्थ व काही साहित्य जप्त केले. हे लिक्विड नेमक्या कोणत्या कारणासाठी वापरले जात होते याचा उलगडा मात्र झालेला नाही. दरम्यान, संबंधित वाडा मालकाकडे पोलिसांनी पुन्हा चौकशी केली असून बामणोली, सावरी परिसरात डॉग स्कॉडने अमली पदार्थ साठ्याच्या अनुषंगाने शोध मोहीम राबवली.
सावरी येथील एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा टाकून 115 कोटींचे घबाड पोलिसांनी शनिवारी जप्त केले होते. त्यामध्ये 50 कोटींचे 7॥ किलोचे एमडी ड्रग्ज, 38 किलो लिक्विड, अमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व साहित्याचाही समावेश होता. याप्रकरणी आतापर्यंत एकूण सातजणांना अटक झाली आहे. बुधवारी सायंकाळी सावरी येथील उद्ध्वस्त ड्रग्ज फॅक्टरीत आणखी काही साहित्य सापडले. अॅन्टी नार्को टेस्ट टास्क फोर्स कोल्हापूर कृती विभाग पुणेच्या पोलिस निरीक्षक नितीन बोधे व काही कर्मचार्यांनी ही कारवाई केली. त्यांच्यासोबत मुंबई अथवा स्थानिक पोलिस नव्हते.
या ठिकाणी केमिकल युक्त 40 लिटरचा एक मोठा कॅन मिळून आला. तो अर्धा भरला असल्याचे संबंधित पोलिस अधिकार्यांनी सांगितले. त्या कॅनमध्ये असलेले केमिकल कोणत्या कारणासाठी वापरले जात होते याबाबतचे स्पष्टीकरण त्यांनी दिले नाही. केमिकलयुक्त लिक्विडबरोबरच काही संशयास्पद साहित्यही त्यांनी जप्त केले. हे साहित्य मेढा पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे पोनि नितीन बोधे यांनी सांगितले. या कारवाईने पुन्हा अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
बुधवारी सकाळी मेढा पोलिसांचा फौजफाटाही बामणोली व सावरीत डॉग स्कॉड घेवून बोटीतून आले होते. संबंधीत श्वानाने बामणोली व सावरी परिसरात ठिकठिकाणी अंमली पदार्थांचा शोध घेतल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली. या परिसरात आणखी कुठे अंमली पदार्थ लपवून ठेवले आहेत का? याचा शोध डॉग स्कॉडने घेतल्याचे समजते.
ड्रग्ज ज्याठिकाणी बनवले जात होते त्या वाड्याचा मालक गोविंद बाबाजी शिंदकर यालाही बुधवारी सकाळी मेढा पोलिसांनी बामणोली येथून उचलले. त्याला घटनास्थळाकडे नेले. यादरम्यान घटनास्थळी काही माध्यमांचे प्रतिनिधी दाखल होते. पोलिसांनी त्यांना पाहिल्यानंतर शिंदकर याला गाडीतून खाली उतरवलेच नाही. गाडीतच सुमारे दहा मिनिटे त्याची चौकश केली. त्यानंतर पोलिस घटनास्थळावरून निघून गेले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळी पोलिस अधिकार्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी काहीही माहिती न देता माध्यमांना टाळले.