

बामणोली : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या जावली तालुक्यातील सावरीच्या ड्रग्ज प्रकरणाला शनिवारी आणखी कलाटणी मिळाली. ड्रग्ज फॅक्टरीसाठी विजेची चोरी केल्याचे वृत्त दै.‘पुढारी’ने 16 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून संबंधित वाडा मालक गोविंद शिंदकर व ओंकार डिगे याच्यावर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची खात्रीशीर माहिती ‘पुढारी’च्या हाती लागली आहे. त्यामुळे ड्रग्ज प्रकरणातील डिगेचा सहभाग उघड होत असून पुन्हा एकदा तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
सावरी गावच्या हद्दीतील ‘जळका वाडा’ म्हणून परिचित असणाऱ्या एका शेडमध्ये मुंबई क्राईम ब्रँचने शनिवार दि. 13 डिसेंबर रोजी पहाटे एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर छापा टाकून 115 कोटींचे घबाड जप्त केले होते. त्यावेळी पोलिसांना ड्रग्ज तयार करण्यासाठी आवश्यक असलेली काचेची भांडी, इलेक्ट्रिक मशिन, प्लास्टिक टब, ट्रे असे साहित्य आढळून आले होते. ड्रग्ज तयार करण्यासाठी विजेची उपकरणे वापरण्यात येत होती.
मात्र, त्यासाठी चोरून विजेचा वापर केला जात होता. या वाड्याच्या जवळ असणाऱ्या एका विजेच्या खांबावरून आकडा टाकून वीज घेण्यात आली होती. ही बाब पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात नोंदवण्यात आली होती. याबाबतची माहिती प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ‘पुढारी’शी बोलताना दिली होती. त्यानुसार दै.‘पुढारी’च्या मंगळवार दि. 16 डिसेंबरच्या अंकात ‘ड्रग्ज फॅक्टरीसाठी विजेची चोरी’ या मथळ्याखाली छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाले होते. ‘पुढारी’चे हे वृत्त खरे ठरले असून मेढा पोलिस ठाण्यात वीज चोरी केल्याप्रकरणी गोविंद शिंदकर व ओंकार डिगे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीज वितरणच्या तापोळा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी याबाबतची तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याबाबत पोलिस माहिती देण्यास टाळाटाळ करत असून वीज वितरणचे संबंधित अधिकारीही कानावर हात ठेवून आहेत.
दै.‘पुढारी’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर हडबडलेल्या वीज वितरणच्या तापोळा फिडरच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी संबंधीत जागेचा मालक गोविंद बाबाजी शिंदकर याला घटनास्थळी बोलावून त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने जबाबामध्ये ‘ओंकार डिगे नामक व्यक्ती माझ्याकडे या ठिकाणी लाईट ओढण्यासाठी वायर मागण्यास आला होता. मी त्याला चावी दिली मात्र लाईटसाठी वायर दिली नव्हती’, असा शिंदकर याचा जबाब नोंदवण्यात आला आहे. वाडा जळाला तेव्हा तेथील विजेचे कनेक्शन बंद करण्यात आले होते. त्यावेळी वीज बिलाची 4 हजार रुपये थकबाकी होती. ती आजही भरलेली नसल्याचे समोर आले आहे.
चोरून वीज वापर केल्याने ग्राहक गोविंद शिंदकर व वीज वापर करणारा ओंकार डिगे या दोघांवर मेढा पोलीस ठाण्यात कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या दोघांवर वीज वितरणने दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई देखील केली आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती द्यायला कोणीही पुढे येत नाही. मात्र, गुन्हा दाखल झाला असल्यामुळे मुंबई पोलिसांनी क्लिनचिट दिलेला ओंकार डिगे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.