

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी हद्दीत हॉटेल सहारा नजीक धाब्यावर जेवण करून रस्ता पास करून आपल्या वाहनाकडे परतणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने उडवले. या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. जिलानी हुसेनसाब नवाब (वय 45) मुळ गाव, विजापूर, सध्या रा. कल्याण, (मुंबई) असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद बसवेश्वर चौक पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.
मृत चालक जिलानी हा बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने आपले वाहन ( ट्रक) घेऊन जात होता. त्याचे वाहन यमगर्णी हद्दीतील हॉटेल सहारा नजिक आले असता, त्यांनी आपले वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन तो जेवण करण्यासाठी रस्ता पास करून पूर्वेकडे असलेल्या धाब्यावर जेवणासाठी गेला होता. जेवण करून परतत असताना बेळगावहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली. या भीषण धडकेत जिलानी यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रस्ते देखभाल जयहिंद कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अमोल नाईक यांनी भेट देऊन पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार घटनास्थळी उपनिरीक्षक आनंद कॅरिकटी यांनी भेट देवून पाहणी केली.
हेही वाचा :