कोल्हापूर : आदमापुरात बकरी बुजवणे कार्यक्रम उत्साहात, ज्या दिशेला दूध ऊतू जाते ती दिशा….
मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा; लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा या देवस्थानचा बकरी बुजवणे कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत येथील मरगुबाईच्या मंदिराजवळ उत्साही धार्मिक वातावरणात संपन्न झाला. ढोल कैताळाच्या गगनभेदी आवाजात, भंडाऱ्याच्या मुक्त हस्ते उधळणीत, बाळूमामाच्या नावाने चांगभलं च्या जयघोषात भक्तगण रंगून गेला होता.
बुधवार दिनांक 26 आक्टोबर रोजी बलिप्रतिपदा, दीपावली पाडवानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बाळुमामा यांनी सुरु केलेली ही बकरी बुजवणे प्रथा त्यांच्या भक्तांनी पुढे अव्याहतपणे सुरू ठेवली आहे. प्रारंभी सवाद्य मिरवणुकीने देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते भंडारा आणण्यात आला. फुलांच्या माळांनी नटवलेली बकरीही पूजा ठिकाणी आणण्यात आली.
बाळूमामाच्या बकऱ्यांच्या लेंड्या एकत्र करून त्याची रास बनवली जाते. या राशीच्या समोर गायीच्या शेणापासून वाडा तयार केला जातो. उस व फुलांच्या माळांनी रास सजवण्यात येते. सभोवती सडारांगोळी रेखाटण्यात येते. बकरी सजवणे, बुजवणे या कार्यक्रमातील प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे येथे दूध ऊतू जाण्याचा कार्यक्रम होय. ज्या दिशेला दूध ऊतू जाते ती दिशा सुजलाम सुफलाम होते. अशी बाळुमामाची भविष्यवाणी आहे. हा क्षण पाहण्यासाठी सारे भाविक आतुर झालेले असतात. धैर्यशील भोसले यांच्या हस्ते राशीवर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. यावर्षी पश्चिम दिशेला दूध ऊतू गेल्याने कोकण विभागात पाऊस पाणी पिके चांगली होतील असा संकेत आज दिला गेला. यानंतर आरती झाली. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी देवस्थान समितीचे धैर्यशीलराजे भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, रावसाहेब कोणकेरी, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, सरपंच विजय गुरव, संजय कणसे, अशोकराव पाटील, शंकरराव कुदळे, उपसरपंच राजनंदिनी भोसले, देवालय समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :

