कौतुकास्पद! बाहत्तरीपर्यंत 1007 वेळा सिंहगड सर, प्रबळ इच्छाशक्तीच्या ज्येष्ठाचा पराक्रम; 97 किल्ले केले पादाक्रांत | पुढारी

कौतुकास्पद! बाहत्तरीपर्यंत 1007 वेळा सिंहगड सर, प्रबळ इच्छाशक्तीच्या ज्येष्ठाचा पराक्रम; 97 किल्ले केले पादाक्रांत

सुनील जगताप

पुणे : गड-किल्ल्यांची सफर करण्याकडे तरुणांबरोबरच ज्येष्ठांचा कल वाढू लागला आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती गड-किल्ल्यांची सफर करू शकते. त्यासाठी वयाची अट नव्हे, फक्त मनाची तयारी आणि इच्छाशक्ती असायला हवी. अशी इच्छाशक्ती असलेल्या उत्तमराव ओवले या 72 वर्षांच्या तरुणाने 1007 वेळा सिंहगड चढण्याचा विक्रम केला आहे.

साधारणपणे 50 ते 60 वर्षे यापुढील ज्येष्ठांना विविध आजारांनी ग्रासलेले असते. अनेक ज्येष्ठ नागरिक व्यायाम करताना आपण पाहतो. कष्टाच्या कामांमुळे आणि नियमित चालण्यामुळे संबंधित कोथरूड परिसरातील ओवले यांनी हा विक्रम केला आहे. केवळ सिंहगडच नव्हे, तर राज्यातील तब्बल 97 किल्ल्यांची पदभ—मंतीही त्यांनी पूर्ण केलेली आहे. कात्रज-सिंहगड हा ट्रेकही त्यांनी तब्बल 7 वेळा पूर्ण केला.

कोथरूड येथील रहिवासी उत्तमराव ओवले हे भारत निगम लिमिटेड (बीएसएनएल) येथून निवृत्त झाले आहेत. ते सन 1979 पासून हनुमान टेकडीवर फिरण्यासाठी जात होते. रोजची चालण्याची सवय असल्याने त्यांनी सन 1980 सालापासून दर रविवारी सिंहगड किल्ल्यावर चढाईचा उपक्रम सुरू केला. गेली चार ते पाच वर्षे वगळता आणि वर्षातील तीन ते चार रविवार वगळता त्यांनी हा उपक्रम नित्याने सुरू ठेवला. दिवाळीच्या मुहूर्तावर ओवले यांनी रविवार दि. 23 ऑक्टोबर रोजी सिंहगड किल्ल्यावर जाण्याचे नियोजन केले. त्याप्रमाणे त्यांनी सिंहगड किल्ला चढून पुन्हा विनाजोखमी उतरलेही आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 1007 वेळा सिंहगड किल्ला सर करण्याचा नवा विक्रम केला आहे.

याबाबत बोलताना उत्तमराव ओवले म्हणाले की, व्यायाम आणि चालण्याची सवय पूर्वीपासूनच असल्याने आमच्या ग्रुपने सिंहगड किल्ल्यापासून सुरुवात केली. मी मात्र दर रविवारी सिंहगडावर जाण्याचा संकल्पच केला. त्याप्रमाणे आत्तापर्यंत किल्ल्यावर जात असल्याने या वेळी 1007 वेळा सिंहगड चढला आहे. त्याचबरोबर तब्बल 97 किल्ले पादाक्रांत केले असून, कात्रज ते सिंहगड हा अवघड ट्रेकही सातवेळा केलेला आहे. माझ्या या संकल्पाचा विडा माझा मुलगा अमित ओवले यानेही उचलला आहे.

Back to top button