

निपाणी : पत्नीसह सासरच्या चौघांकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याच्या कारणावरून लक्ष्मी नगर,अंकली (ता.चिकोडी) येथील मेंढपाळ मंजुनाथ आण्णाप्पा चिलोजी (वय २६) याने दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना वराह (ता. हिरेकेरूर जि. हावेरी) येथे घडली.याबाबत हिरेकेरूर पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास चालवला आहे.विशेष म्हणजे मयत मंजुनाथ याने आत्महत्येपूर्वी आपल्या मोबाईलवर तसा स्टेटस ठेवत शिवाय व्हिडिओ फॉरवर्ड करत आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
याबबातची अधिक माहिती अशी की, मंजुनाथ हा सध्या आपल्या कुटुंबीयांसमवेत मेंढपाळ व्यवसायासाठी हिरेकेरूर भागात राहत होता.मयत मंजुनाथ चिलोजी याचा गेल्या दोन वर्षांपूर्वी नवलीहाळ (ता.चिकोडी) येथील नात्यातील एका मुलीशी विवाह झाला होता.
दरम्यान वर्षभरानंतर मंजुनाथ व सासरच्या लोकांमध्ये मतभेद निर्माण होऊन खटके उडत गेले.त्यानुसार मंजुनाथ याला सासरकडून झालेला मानसिक व शारीरिक छळ सहन न झाल्याने त्याने आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवत शिवाय व्हिडिओ फॉरवर्ड करत बकरी बसलेल्या शिवारातच लिंबाच्या झाडाला त्याने गळफासाने जीवन संपवले. ही घटना लक्षात येताच तातडीने कुटुंबीयांनी आरडाओरडा केली. घटनास्थळी हिरेकेरूर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली.
याबाबत मयत मंजुनाथ याची बहीण हिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पत्नी,सासू, सासरा व दोन पंच (नातेवाईक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास चालविला आहे. मयत मंजुनाथ यांच्या पश्चात आई,वडील,दोन भाऊ,तीन बहिणी असा परिवार आहे. शनिवारी मंजुनाथ याच्यावर मूळगावी अंकली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.