

निपाणी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पट्टणकुडी (ता.चिकोडी) येथील ग्रामदैवत महालक्ष्मी देवीच्या यात्रेला गुरुवारी ( दि.18) प्रारंभ झाला असून यात्रेची शनिवारी ( दि.19) सांगता होणार आहे. गुरुवारी सायंकाळी 6 वा. मंदिरापासून बसस्थानकापर्यंत देवीचा भव्य पालखी मिरवणूक सोहळा हजारो भविकांच्या उपस्थितीत पार पडला. हा पालखी सोहळा शुक्रवारी सकाळी सहापर्यंत तब्बल 12 तास चालला. या काळात भक्तांच्यावतीने महालक्ष्मीच्या नावानं चांगभलचा अखंड जयघोष करण्यात आला. त्यामुळे परिसरातील वातावरण दुमदुमून गेले होते.
प्रारंभी पालखीचे पूजन मंदिराचे पुजारी, ट्रस्टी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विधिवत पार पडले. त्यानंतर महालक्ष्मी देवीची पालखी येथील बसस्थानक परिसरात असणार्या ओढ्यानजीक अकोळे मळा येथे आल्यानंतर देवीला विधिवत अभिषेक, पूजा विधी करून बँड बेंजोच्या गजरात पुन्हा मंदिराकडे रात्री बाराच्या सुमारास पालखी रवाना झाली. या दरम्यान संपूर्ण गावातून हा पालखी सोहळा पार पडला.
यावेळी आकर्षक फटाक्यांची आतषबाजी आणि ठिकठिकाणी केलेल्या विद्युत रोषणामुळे संपूर्ण पट्टणकुडी गाव भक्तिमय झाले होते. यावेळी गंगाकलश घेऊन अनेक सुवासिनी पालखी मिरवणुकीत सहभाग झाल्या होत्या. मिरवणुकीनंतर पालखी मुख्य मंदिरात पोहोचली. यावेळी कल्लोळ नदीमधून पायी चालत जाऊन आणलेले गंगाजल श्री चरणी अर्पण करण्यात आले.
शुक्रवारी सकाळी अभिषेक व पूजाविधी पार पडल्यानंतर दुपारी महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी हजारो भविकांनी मंदिरात देवीच्या दर्शनासह नैवेद्य अर्पण तसेच महाप्रसादासाठी गर्दी केली होती. या काळात निपाणीचे सीपीएस बी.एस. तळवार यांच्या नेतृत्वाखाली खडकलाट पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका अनिता राठोड यांनी सहकारी पोलिस कर्मचार्यांच्या मदतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.