

निपाणी : निपाणीनजीकच्या रामपूरमध्ये (ता. चिकोडी) बुधवारी (दि. 9) महाराष्ट्रीयन बेंदूर उत्साहाने साजरा करण्यात आला. सायंकाळी झालेला करतोडणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी निपाणी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.
महाराष्ट्रात आषाढ पौर्णिमेला बेंदूर किंवा बैलपोळा साजरा करण्याची परंपरा आहे. रामपूर कर्नाटकातील गाव असले तरी येथे महाराष्ट्रीय बेंदूर गेल्या अनेक वर्षापासून साजरा केला जातो. बैलांना शेतीच्या कामातून आराम देऊन त्यांची पूजा करण्यात आली. बैल नसलेल्यांनी घरी मातीच्या बैलांची पूजा केली.
बैलांना सजवून संध्याकाळी त्यांची वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. रामपूरचे पोलिस पाटील व बैलाचे मानकरी महेश पाटील, प्रतीक पाटील व आर. वाय. पाटील कुटुंबियांनी बैलाची मानाप्रमााणे पूजा केली.
सणानिमित्त घरोघरी पै पाहुणे दाखल झाले होते. घरोघरी गोड जेवणाचा बेत करण्यात आला होता. बेंदूर सण साजरा करण्यासाठी यावेळी कुमार पाटील, प्रतीक पाटील, विनायक पाटील, मलगोंडा पाटील, वल्लभ देशपांडे, अण्णासाहेब तांदळे, सचिन पोवार, सचिन मदने, गोविंद पोवार, सूरज कुंभार, शशिकांत नेसरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. खडकलाट पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.