

विजापूर : मुद्देबिहाळ शहरातील विजापूर रोडवरील साई वसाहत येथे मध्यरात्री एका जेसीबीचा वीजखांबाला धक्का लागल्याने घरात अचानक जादा वीजप्रवाह शिरला. या घटनेत महिबूब कुमसी यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, मिक्सर, पंखे आदी उपकरणे जळून खाक झाली. यामध्ये सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सुरक्षेच्या उपायांशिवाय मध्यरात्री जेसीबी चालवत अवैध वाळू वाहतूक केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अशा अवैध कारवायांकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.
या घटनेत घरातील सर्व विद्युत उपकरणे जळल्याने त्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शॉर्टसर्किटमुळे लागलेली आग आटोक्यात आणल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. तसेच अवैध वाळू वाहतुकीस जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी आणि नुकसानग्रस्त कुटुंबाला तात्काळ भरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.