

बेळगाव : तो पाने, वनस्पती आणि जंगली फळे खातो. जवळपास 80 प्रकारच्या पानांचा त्याचा आहार आहे. त्याने गेल्या दहा वर्षांत एकदाही शिजवलेल्या अन्नाला स्पर्श केलेला नाही. आपण जंगलबुक मधला मोगली टीव्ही, पुस्तकांत पाहिला असेल किंवा सिनेमांत असणारा टारझन. अगदी तशाच प्रकारे हा मॉडर्न टारझन गेल्या दहा वर्षांपासून सौंदत्तीच्या जंगलात राहतोय.
मूळचा सौंदत्ती तालुक्यातील उगळखोड गावातील असलेला बुदन खान जंगलामध्ये राहतोय. त्याने मानवी जीवनातील नातेसंबंध, आहार पद्धतीचा त्याग केला आहे. माकडांचे अनुकरण करून तो जंगलातच वास्तव्यास आहे. अनेकांच्या नजरेस तो पडतो. जंगलात राहून रानटी जगणार्या या मॉडर्न टारझनला कधीही आजार झाल्याचे लोकांनी पाहिलेले नाही. एकेकाळी एक सामान्य जीवन जगणार्या बुदन खानने लोकांकडे पाठ फिरवली. त्याने खडक आणि टेकड्यांमध्ये एकांतवासाचे जीवन निवडले.
जंगलात गेल्यापासून त्याने शिजवलेले अन्न खाल्लेले नाही. त्याऐवजी तो पाने, वनस्पती आणि जंगली फळे खातो. स्थानिक लोक म्हणतात की त्याने माकडांचे निरीक्षण करून ही असामान्य सवय शिकली. आज तो जवळजवळ 80 प्रकारची पाने खातो. यामुळे तो एक गूढ बनला आहे.
दोन भाऊ आणि पालक जिवंत असूनही, बुदन खानने त्याच्या कुटुंबाशी संबंध तोडले आहेत. त्यांनी त्याला घरी परत आणण्याचा वारंवार प्रयत्न केला, परंतु तो नकार देतो. तो फक्त एक जोडी पँट घालतो आणि इतर कोणतेही कपडे वापरत नाही.