

बेळगाव : दिवसभर वाढलेल्या उष्म्यामुळे संध्याकाळी शहर आणि तालुक्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा पाणीच पाणी झाले.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पण ढगाळ वातावरण होते. आजही सकाळी ढगाळ वातावरण होते. पण, दुपारनंतर उष्म्यात वाढ झाली. साडेतीनच्या सुमारात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर संध्याकाळी सातच्या सुमारात शहर आणि तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. परतीच्या पावसामुळे ढगांचा गडगडाटही झाला.
अचानक मोठा पाऊस कोसळल्यामुळे अपघातप्रवण क्षेत्र बनलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील केके कोप्प आणि बडेकोळ्ळमठाजवळ रहदारी कोंडी झाली. पावसाचे पाणी महामार्गावर साचल्याने रहदारीला अडथळा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. एका तासानंतर पावसाचे पाणी ओसरले. त्यानंतर रहदारीची कोंडी दूर झाली.
सध्या मोठा पाऊस नसला तरी अचानक येणारी मोठ्या पावसाची सर रस्त्यावर पाणी येण्यास कारणीभूत ठरली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील रायगड ढाबा ते बडेकोळ्ळमठ या दरम्यान पाणी साचले. यातून वाहने चालवणे कठीण बनले होते. काही अवजड वाहने जात होती. परंतु, कारसह अन्य वाहने थांबून होती. त्यामुळे दोन्ही बाजूंनी रात्री नऊ वाजेपर्यंत रहदारी कोंडी झाली होती. महामार्ग प्राधीकरण, हिरेबागेवाडी ठाण्याचे पोलिस व अन्य कर्मचार्यांमार्फत येथील कोंडी हटवण्यासाठी प्रयत्न केले. धारवाडकडे जाणार्या रस्त्यावरील पाणी रात्री उशिरापर्यंत थांबून होते. बेळगावला येणार्या रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यात यंत्रणेला यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.