

बेळगाव : सध्याचे युग हे संगणकीय युग आहे. मोबाईल, लॅपटॉप यासह इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये सुरु आहे. त्यात आता अंधश्रद्धाही मागे पडली नाही. एका अंधश्रद्धाळूने उतार्यामधून चक्क मोबाईलच टाकला असल्याने हा एक चर्चेचा विषय झाला असून आता तंत्रज्ञानही अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
येळ्ळूर रस्त्यावरील शिवारामध्ये उतारा फेकताना एका अंधश्रद्धाळूने त्यात मोबाईलही ठेवला आहे. रविवारी (दि. 3) सकाळी ही घटना काही शेतकर्यांनी पाहिली आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. दहीभात ,एक नारळ, चार लिंबू, पानविडा आणि मोबाईल असा हा उतारा आहे. भोंदूबाबा आपल्या भक्ताला कशाप्रकारे अंधश्रद्धेला बळी पाडतात हे एक मोठे उदाहरणच आहे. मोबाईल उतार्यामध्ये टाकण्यामागचा उद्देश काय असेल याचा तर्क लावणे तसे कठीणच आहे. मात्र, याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
उलट्या पिसांचा कोंबडा, दही भात, लिंबू, गुलाल, कुंकू हळद, अंडी, कोहळा आधी उतार्यामध्ये फेकून देण्याचे प्रकार यापूर्वी वारंवार दिसून येतात. मात्र आता चक्क मोबाईलच उतार्यामध्ये फेकून देण्यात आल्याने या उतार्याबाबत येळ्ळूर, शहापूर, जुने बेळगावसह शहरातही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.