

Dental Floss Needle Free Vaccination
कोल्हापूर : लसीकरणासाठी वापरली जाणारी इंजेक्शनची सुई ही अनेकांसाठी भीतीचा विषय ठरते. याच भीतीमुळे अनेकजण विशेषतः लहान मुले लसीकरणाकडे पाठ फिरवतात; मात्र या समस्येवर कोल्हापूरच्या एका युवा संशोधकाने क्रांतिकारी तोडगा शोधून काढला आहे. हुपरीसारख्या ग्रामीण भागातून अमेरिकेपर्यंत मजल मारलेल्या डॉ. रोहन इंग्रोळे यांनी चक्क दातांच्या स्वच्छतेसाठी वापरल्या जाणार्या ‘डेंटल फ्लॉस’च्या मदतीने यशस्वी लसीकरण करून दाखवले आहे. अमेरिकेतील टेक्सास टेक विद्यापीठात उंदरांवर केलेला त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.
काय आहे हे क्रांतिकारी संशोधन?
डॉ. इंग्रोळे यांनी तोंडाच्या आणि हिरड्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीचा अभ्यास केला. तोंडातील त्वचा (ओरल म्युकस) ही रोगप्रतिकारक पेशींनी समृद्ध असते, हे लक्षात घेऊन त्यांनी लसीकरणासाठी याच भागाचा वापर करण्याचे ठरविले. या प्रयोगात त्यांनी निर्जंतुक केलेल्या विषाणूजन्य कणांचा लेप (तरललळपश उेरींळपस) डेंटल फ्लॉसवर दिला. त्यानंतर या फ्लॉसने उंदरावर प्रयोग केला. या प्रक्रियेत फ्लॉसवरील लसीचे कण उंदराच्या रोगप्रतिकारक प्रणालीपर्यंत पोहोचले आणि यशस्वीरीत्या लसीकरण पूर्ण झाले. तोंडावाटे दिले जाणारे ड्रॉप्स किंवा नाकावाटे दिले जाणारे स्प्रे यांच्या साठवणुकीत आव्हाने असतात. त्यामुळे डॉ. इंग्रोळे यांचे हे संशोधन एक प्रभावी पर्याय ठरू शकते.
संशोधनाचे फायदे
सुईच्या भीतीचा अंत: लसीकरणातील इंजेक्शनची भीती नाहीशी होईल.
वेदनांपासून मुक्ती : ही प्रक्रिया पूर्णपणे वेदनारहित असल्याने लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी सोयीची ठरेल.
कमी प्रशिक्षणाची गरज : या पद्धतीसाठी इंजेक्शन देण्याइतक्या विशेष आरोग्य प्रशिक्षणाची गरज भासणार नाही, ज्यामुळे आरोग्य कर्मचार्यांवरील भार कमी होईल.
दुर्गम भागासाठी वरदान : मर्यादित संसाधने आणि सुविधा असलेल्या दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
वैद्यकीय कचरा कमी : सुई आणि सीरिंजमुळे निर्माण होणारा वैद्यकीय कचरा टाळता येईल.
हुपरी ते अमेरिका प्रवास
डॉ. रोहन इंग्रोळे यांना राजकीय, सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या कुटुंबाची पार्श्वभूमी आहे. त्यांचे आजोबा दिवंगत रयत शिक्षण संस्थेचे तत्कालीन पदाधिकारी शांताप्पाण्णा व पारिसाण्णा इंग्रोळे हे हुपरीतील प्रतिष्ठित व्यक्ती होते. डॉ. रोहन यांचे वडील सुरेश इंग्रोळे हे कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संचालक आहेत. डॉ. रोहन यांचे प्राथमिक शिक्षण हुपरीतील बाबासाहेब खंजिरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये, अकरावी, बारावीचे शिक्षण पारिसाण्णा इंग्रोळे कॉलेजमध्ये झाले. डॉ. हरंविंदर सिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एमएस व पीएचडी पदवी मिळवली.