

बेळगाव : एकीकडे सीमाभागातील सरकारी आणि खासगी क्षेत्रातही कानडीकरणाचा बेकायदा बडगा उगारण्यात येत असताना आता मराठी विषयातून एमए झालेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावण्यात आले आहे. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने के-सेटमधून मराठी विषयच वगळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, सीमाभागात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
परीक्षा प्राधिकरणाने नुकताच के-सेटसाठी अधिसूचना जारी करुन परीक्षेसाठी 28 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. 18 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. 2 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. पण, अधिसूचनेत मराठी विषयच नाही. त्यामुळे, मराठी विषयात एमए करुन प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणार्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठ, धारवाड आणि गुलबर्गा येथील विद्यापीठांत मराठी विभाग आहेत. त्याठिकाणी दरवर्षी अनेक विद्यार्थी मराठी विषयांत एमए करतात. प्राध्यापक होण्यासाठी के-सेट आवश्यक आहे. त्यामुळे, या परीक्षेचा कसून अभ्यास करण्यात येतो. गेल्यावर्षी परीक्षेसाठी बंगळूर हे केंद्र होते. यंदा मात्र, परीक्षेतून मराठी विषयच वगळण्यात आला आहे. त्यामुळे, तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
के-सेटमधून मराठी विषय वगळून कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे, याविरोधात सोमवारी (दि. 25) जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची म. ए. युवा समिती पदाधिकारी भेटणार आहेत. याशिवाय केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगालाही पत्र लिहून तक्रार करणार आहे, असे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी कळविले आहे.