

बेळगाव : तीन दिवसांच्या संततधारेनंतर पावसाने गुरुवारी (दि. 21) सलग दुसर्या दिवशी उसंत घेतली. दिवसभरात अनेकदा सूर्यदर्शन झाले. पाऊस थांबल्यामुळे गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून आली. तथापि आणखी दोन दिवस पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संततधार पाऊस पडत असल्यामुळे गेल्या तीन दिवसांत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तर गणेशोत्सवाच्या तोंडावर पावसामुळे बाजारपेठेकडे लोकांनी पाठ फिरवली होती. पण, गुरुवारी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. नदी, नाल्यांतील पाणीही वेगाने ओसरले. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून पाण्याखाली गेलेल्या पिकांना जीवदान मिळाले असल्यामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
बंगळूर : चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यात पाऊस सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. कारवार, मंगळूर, चिक्कमगळूर, शिमोगा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बेळगाव, धारवाड व हसन जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बागलकोट, बिदर, गदग, हावेरी, गुलबर्गा, कोप्पळ, रायचूर, विजापूर, यादगिरी, बंगळूर शहर, बंगळूर ग्रामीण, चामराजनगर, चित्रदुर्ग, कोडगू, कोलार, मंड्या, म्हैसूर, रामनगर, तुमकूर, विजयनगर जिल्ह्यातही पाऊस मोठ्या प्रमाणात पाउस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.