

बेळगाव : कर्नाटक सरकारने सीमाभागात चालवलेल्या कन्नडसक्तीविरोधात 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या रविवारी (दि. 27) मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते.
सीमाभागात कर्नाटक सरकारने कन्नडसक्ती तीव्र केली आहे. सरकारी कार्यालयातील फलकांवरील इंग्रजी व मराठी भाषेतील नामफलक काढून केवळ कन्नड भाषेत नामफलक लावण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सरकारी कामकाज केवळ कानडी भाषेतच व्हावे, असे निर्देशदेखील देण्यात आले आहेत. त्यामुळे मराठी भाषेची मोठी गैरसोय होत आहे. भाषिक अल्पसंख्याक अधिकारांवर गदा आणली जात आहे. त्यामुळे याविरोधात जिल्हाधिकार्यांना नुकतेच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे निवेदन देण्यात आले होते. त्यांना दिलेल्या मुदतीनुसार 11 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा मोर्चा काढण्याचा आणि मराठी भाषिकांची एकजूट दाखवण्याचा निर्धार केला.
11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता धर्मवीर संभाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या घटक समित्यांनी बैठका घेऊन जनजागृती करावी व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आरपारच्या लढाईला सज्ज राहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीतर्फे करण्यात आले आहे.
मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, रामचंद्र मोदगेकर, बी. डी. मोहनगेकर, मनोहर हुंदरे, रणजित पाटील, बाळासाहेब शेलार, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, वसंत नावलकर, लक्ष्मण पाटील, अॅड. एम. जी. पाटील, जयराम देसाई आदींनी विचार मांडले.
बैठकीला रावजी पाटील, मल्लाप्पा गुरव, अजित पाटील, मुरलीधर पाटील, पांडुरंग सावंत, बी. बी. देसाई, गोपाळ पाटील, अनिल पाटील, विठ्ठल पाटील, विकास कलघटगी, बी. ओ. येतोजी, अॅड. अमर यळ्ळूरकर, अॅड. महेश बिर्जे आदी उपस्थित होते.
या बैठकीत महापालिकेत मराठी भाषेविषयी आवाज उठवत सभात्याग केलेल्या म. ए. समितीच्या नगरसेवकांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पाठीशी समिती ठाम उभी आहे, असे सांगण्यात आले. दरम्यान, लवकरच कोल्हापूर येथे सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीच्या सदस्यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच मंत्री एच. के. पाटील यांनी महाजन अहवालाची न्यायालयात मागणी करून दाखवावी, उठसूठ तुणतुणे वाजवू नये, असे आव्हानही देण्यात आले.