

बेळगाव : देशविदेशात मनपसंत ठिकाणी फिरायला जाण्यासाठी ‘पुढारी’ने विविध टूर्स कंपन्यांना एकाच छताखाली आणले आहे. सध्या फिरायला जाणार्यांची संख्या वाढत आहे. पण, नेमकी माहिती मिळत नसल्याने नियोजनात अडथळे येतात. ‘पुढारी’च्या प्रदर्शनामुळे ही अडचण दूर होणार असून बेळगावकरांनी ही एक पर्वणी आहे, असे मत महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
दैनिक ‘पुढारी’तर्फे आयोजित आणि ‘गगन टूर्स’ प्रस्तुत व ’अ हेवन हॉलिडेज’ पॉवर्ड ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 25) मराठा मंदिरमध्ये झाले. यावेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. महापौर मंगेश पवार प्रमुख पाहुणे होते.
त्या पुढे म्हणाल्या, ‘पुढारी’ ने सामाजिक बांधिलकी जपत वाटचाल सुरु ठेवली आहे. प्रदर्शन पाहून पर्यटनप्रेमींचे समाधान झाल्याशिवाय राहत नाही. येथील दर परवडणारे आहेत. किती दिवस फिरायला जायचे हे प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ठरवता येते. देशातील सुंदर स्थळांसह सिंगापूर, थायलंड, दुबई असे कुठेही जायचे असेल तर परवडणारे दर आहेत. कुटुंबासमवेत वर्षातून एकदा फिरायला जाणार्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अशा लोकांना याठिकाणी सात- आठ दिवसाची सहल निवडता येते. धार्मिक स्थळांसाठी वेगवेगळी ठिकाणे आणि पॅकेज आहेत. त्यामुळे, हे प्रदर्शन बेळगावकरांना खूप लाभदायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर पवार म्हणाले, ‘पुढारी’ने प्रथमच टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रदर्शन भरवले असले तरी अनेक लोकांसाठी हे पहिलेच प्रदर्शन असणार आहे. लोकांना प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यास हे प्रदर्शन मदत करणार आहे. विशेष सवलती आणि आकर्षक ऑफर ही पर्यटनप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. याठिकाणी स्टॉलची मांडणी नेटकी व आकर्षकरित्या केली असून ज्ञान आणि अज्ञात स्थळांची माहिती जाणून घेता येते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
प्रारंभी मंत्री हेब्बाळकर व महापौरपवार यांनी फीत कापून व दीपप्रज्वलन करुन प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यानंतर मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गगन टूर्स कोल्हापूरच्या संचालिका नंदिनी खुपेरकर, मार्केटिंग हेड योगेश सोनटक्के, अ हेवन हॉलिडे कोल्हापूरच्या संचालिका वर्षा बुगडे, सह-संचालिका प्रणिता बुगडे, मंत्र्यांचे माध्यम सल्लागार एम. के. हेगडे आदी उपस्थित होते. निवासी संपादक गोपाळ गावडा, वरिष्ठ व्यवस्थापक (इव्हेंट्स) राहुल शिंगणापूरकर, विभागीय व्यवस्थापक (एसआय) बाळासाहेब नागरगोजे, साहायक व्यवस्थापक विनायक धामणेकर, रिया भांदिगरे, संजय सूर्यवंशी यांनी मान्यवरांचे स्वागत केले.