

बेळगाव : परदेशात निर्यात केलेला आंबा खराब झाला म्हणून तेथील व्यावसायिकाने स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे, झालेल्या नुकसानीबाबत आंबा व्यापार्याने विमा कंपनीकडे नुकसान भरपाई मागितली. मात्र, कंपनीने नकार दिल्याने व्यापार्याने ग्राहक न्यायालयात दाद मागितली. त्यानुसार दोन्ही बाजू संबंधित व्यापार्याला 83 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच 62 लाख 30 हजार 395 रुपये देण्याचा आदेश जिल्हा अतिरिक्त ग्राहक न्यायालयाने आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीला बजावला आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, तक्रारदार व्यापारी जमादार बेळगावात फळे आणि भाजीपाल्याची आयात-निर्यात करतात. त्यांनी 12 मे 2020 रोजी मुंबई बंदरातून ओमानला एकूण कच्च्या आंब्यांच्या 10 हजार पेट्यांची निर्यात केली. याबाबत विमा कंपनीला पूर्वसूचनाही दिली होती. आंबे 28 मे 2021 रोजी ओमानमध्ये पोचले. परंतु, ते कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.
तेथील आयातदारांनी आंब्याच्या पेट्या स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे, जमादार यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र, कंपनीने विमा देण्यास नकार दिला. शेवटी त्यांनी 2 जून 2020 रोजी 12 टक्के व्याजदराने 83 हजार अमेरिकन डॉलर्स (62 लाख 30 हजार 395 रुपये) भरपाईची मागणी करणारी तक्रार जिल्हा ग्राहक न्यायालयात दाखल केली. त्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने जमादार यांना 62 लाख 30 हजार 395 रुपये देण्याचे आदेश बजावले आहेत. त्याचबरोबर मानसिक त्रास झाला म्हणून 50 हजार तर न्यायालयीन खर्चासाठी 50 हजार देण्याचे आदेश ग्राहक आयोगाचे अध्यक्ष महांतेश शिगळी व सदस्य गिरीश पाटील यांनी दिले आहेत.