

बेळगाव : शहर परिसरात थंडीचा कडाका वाढला असून जनजीवनावर परिणाम जाणवत आहे. चार दिवसांपासून तापमानात लक्षणीय घट झाली आहे. बुधवारी पहाटे शहराचा पारा 12 अंशांवर घसरला होता. दिवसभरही सूर्यदर्शन दुर्मीळ झाले आहे. गारठवून टाकणार्या थंडीमुळे पहाटे फिरायला जाणार्या नागरिकांच्या संख्येत घट झाली आहे.
डिसेंबरच्या सुरुवातीपासून थंडीचे प्रमाण वाढले. शहरात सायंकाळी सहापासून हवेत गारठा जाणवू लागला आहे. गेल्या आठ दिवसांपासून किमान तापमानामध्ये लक्षणीय घट झाली आहे. बेळगावमध्ये दरवर्षी थंडीचा अनुभव असतो. यंदा मात्र थोडी उशीरा थंडीची तीव्रता जाणवत आहे. पहाटेच्या वेळी आणि संध्याकाळनंतर थंडीचा जोर वाढत आहे.
थंडीमुळे गरम कपड्यांचा वापर वाढला असून वाहने मंद गतीने चालवावी लागत आहेत. उपनगरात आणि ग्रामीण भागात नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवताना दिसत आहेत. गरमागरम चहाची दुकाने आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर गर्दी वाढली आहे. थंडीच्या कडाक्यामुळे बाजारात गरम कपड्यांची मागणी वाढली आहे. लहान मुलांसाठी तसेच वृद्धांसाठी नागरिकांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांमध्ये वाढ झाली असून दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे.