

बंगळूर : मंगळूर शहर ड्रग्जमुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त सुधीरकुमार रेड्डी यांनी पहिल्यांदाच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या केरळच्या विद्यार्थ्यांची ड्रग्ज चाचणी केली. पूर्वसूचनेशिवाय एकाच दिवसात 200 जणांची चाचणी घेतली. मात्र, एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळला नाही. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
येथील डेरालकट्टे भाग ड्रग्ज राजधानी म्हणून हिणवला जात आहे. केरळमधील विद्यार्थी बहुतेकदा ड्रग्जचे व्यसन करतात आणि ड्रग्ज तस्कर म्हणूनही काम करतात, असे आरोप केले जातात. अलीकडेच काँग्रेस नेते सुहेल कंडक यांनी मंगळूर पोलिसांच्या सहकार्याने ड्रग्जविरुद्ध मोहीम उघडली होती. यासंदर्भात एक कार्यशाळाही घेण्यात आली होती. ड्रग्ज तस्कर पुरवठा करणाऱ्यांची यादी करण्यात आली होती. दरम्यान अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरवले जात असल्याचा आरोप होता. त्यामुळे, सीईएनसह उल्लाळ आणि कोनाजे पोलिस ठाण्याच्या साहाय्याने विद्यार्थ्यांची अचानक तपासणी करण्यात आली. महाविद्यालयांच्या प्रशासनाला विश्वासात घेऊन ही कारवाई झाली. बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तपासणी केंद्रात नेऊन चाचणी करण्यात आली.
कोनाजेतील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन बसेसमधील 87 विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्याचप्रमाणे डेरालकट्टेतील के. एस. हेगडे मेडिकल कॉलेज, कनाचूर मेडिकल कॉलेज, मंगळूरमधील अलॉयसियस कॉलेज आणि फिशरीज कॉलेजमधील एकूण 200 विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली. त्यापैकी कुणीही ड्रग्जसाठी पॉझिटिव्ह आढळले नाही. उर्वरित विद्यार्थ्यांनी तपासणीत सहकार्य केले. त्यामुळे, पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला. आयुक्तांच्या सूचनेनुसार मंगळूर पोलिसांनी इतिहासात पहिल्यांदाच अशी कारवाई केली.