Bengaluru Drug Factory Case | बंगळूर येथील ड्रग्ज फॅक्टरीचे चंदगड कनेक्शन

म्हाळेवाडीतून तरुणाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई
Bengaluru Drug Factory Case
Bengaluru Drug Factory Case | बंगळूर येथील ड्रग्ज फॅक्टरीचे चंदगड कनेक्शनPudhari File Photo
Published on
Updated on

चंदगड : बंगळूर येथे ड्रग्ज फॅक्टरीचे तीन कारखाने नवी मुंबई येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने उद्ध्वस्त केले. यामध्ये 56 कोटी 88 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज व मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील प्रशांत यल्लाप्पा पाटील (33) याला मुंबई येथून आलेल्या विशेष पथकाने ताब्यात घेऊन अटक केली. त्याला शुक्रवारी पहाटे मुंबई येथे नेण्यात आले.

या पथकाने प्रथम साध्या वेशात गावामध्ये येऊन चौकशी केली. यानंतर गुरुवारी मध्यरात्री या तरुणाला ताब्यात घेतले. प्रशांत हा यात सूत्रधार असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचे बीएससीपर्यंत शिक्षण झाले असून तो यापूर्वी रोहा, रायगड येथे एका केमिकल कंपनीमध्ये कार्यरत होता. मात्र अलीकडे त्याने नोकरीचा राजीनामा दिला. वाशी, मुंबई येथील अब्दुल कादर रशीद शेख, सुरेश रमेश यादव व मालाखान रामलाल बिश्नोई (दोघेही राजस्थान) यांनाही अटक केल्यानंतर प्रशांत याला ताब्यात घेतले.

शेख याच्याकडून दीड किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रशांत याला ताब्यात घेतले. यानंतर त्याचे कारनामे उघडकीस आले असून बंगळूर येथील स्पंदना लेआऊट, कॉलनी, एनजी गोलाहळी येथे आर. जे. इव्हेंट फॅक्टरी व येरपनाहळी कन्नूर येथील आरसीसी घरात एमडी ड्रग्ज फॅक्टरीवर कारवाई केली. येथून चार किलो एमडी ड्रग्ज व 17 किलो द्रव स्वरूपातील रसायन, यंत्रसामग्री असा 55 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील एका पोल्ट्री शेडमध्ये ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला होता. आता दोन वर्षांनंतर अशाच प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news