

संपूर्ण जिल्ह्यातील शाळा, हायस्कूल, पीयूसी कॉलेजना सुट्टी
चिकोडी परिसरातील नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
अलमट्टीतून वाढीव विसर्ग; साठा 100 वरून 90 टक्क्यांवर
गणेशोत्सव खरेदीवर पावसाचा परिणाम; उसंतीची अपेक्षा
बेळगाव : सलग तिसर्या दिवशी मंगळवारी पावसाचा जोर कायम राहिल्याने जिल्हा गारठला आहे. जिल्ह्यातील सगळ्याच नद्या दुथडी भरून वाहत असून, चिकोडी परिसरातील तब्बल 11 पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रहदारी विस्कळीत झाली आहे. गोकाक शहरात पावसाने भिंत पडून महिलेचा मृत्यू झाला. संततधारेमुळे राकसकोप धरण सोमवारीच भरले होते. मंगळवारी हिडकल जलाशयही पूर्ण भरला असून, विसर्गही वाढवण्यात आला आहे. मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. त्यामुळे पूर्ण जिल्ह्यातील अंगणवाड्या, शाळा, हायस्कूल आणि पीयूसी महाविद्यालयांना जिल्हाधिकार्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
मंगळवारी दुपारनंतर जोरदार पावसाने बेळगावला झोडपले. परिणामी, शहर परिसरातील नाले आणि मार्कंडेय नदी पुन्हा ओसंडून वाहू लागली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका गणेशोत्सवाच्या तोंडावर सजलेल्या बाजारपेठेला बसला आहे. मंगळवारी बाजारात तुरळक लोक दिसत होेते.
संततधारेमुळे शहरातील अनेक भागांत पाणी तुंबून राहिले आहे. महापालिकेने नालेसफाईचा दावा केला असला, तरी शास्त्रीनगर येथील नाल्यातून पाणी वाहून जाण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे एसपीएम परिसरातील रस्त्यांलर पाणी तुंबले होते, तर काही भागांतील घरांत आणि दुकानांतही पाणी शिरले.
सदाशिवनगरच्या नाल्यातून पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरातील अनेक घरांत पाणी शिरले. रस्त्यांत पाणी आल्यामुळे लोकांना ये-जा करणे कठीण झाले. रविवार पेठ, नरगुंदकर भावे चौक, मेणसे गल्ली आदी भागांत पाणी तुंबून राहिल्याने भाजी विक्रेत्यांना त्रास सहन करावा लागला.
तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. बळ्ळारी नाल्याला पूर आल्यामुळे परिसरातील हजारो एकर शेत जमीन पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकर्यांना पिके वाया जाण्याची भीती लागून आहे. राकसकोप जलाशयाच्या दोन दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यात संततधार पाऊस असल्यामुळे हिंडलगा येथील जलशुद्धीकरण केंद्र पाण्याखाली जाण्याची भीती आहे. हिडकल आणि नवीलूतीर्थ जलाशयातूनही नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांत खबरदारीचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन बुधवारी (दि. 20) जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. ते सकाळी 11 वाजतागोकाक जवळील लोळसूर बंधार्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर गोकाक शहरातील निवारा केंद्राला भेट देणार आहेत.
हिडकल धरण 100 टक्के भरले असून, 20800 क्युसेक पाण्याचा विसर्ग घटप्रभा नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे घटप्रभा व हिरण्यकेशी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. घटप्रभा नदीवर असलेले हिडकल धरण 51 टीएमसी क्षमतेचे असून, सध्या धरण पूर्ण भरले आहे. धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे घटप्रभा व हिरण्यकेशी नदी काठावरील रहिवाशांनी जनावरांसह सुरक्षित ठिकाणी जावे, अशी सूचना सहाय्यक कार्यकारी अभियंता जगदीश बी. के. यांनी केले आहे.
गोकाक शहरामध्ये मुसळधार पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. शहरातील संगमनगर येथे घर पडल्यामुळे एक महिला ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. फरीदाबानू शकीलहमद कनवाडे (वय 50) असे या महिलेचे नाव आहे. रियाज व आणखी एक जण जखमी झाला असून त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.
पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती रोखण्यासाठी अलमट्टी जलाशयातून दोन लाख क्युसेक पाणी कृष्णा नदीत सोडण्यात येत आहे. अलमट्टी जलाशयाची क्षमता 123 टीएमसी आहे. 15 ऑगस्ट रोजी जलाशयात 123 टीएमसी पाणीसाठा झाला होता. पण, त्यानंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. सध्या जलाशयात 1,11,306 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी नदीपात्रात 2 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सध्या धरणात 111.644 टीएमसी म्हणजेच 90.71 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
संततधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून बुधवारी (दि. 20) पूर्ण बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाड्या, शाळा, पदवीपूर्व कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हा आणि चिकोडी शैक्षणिक जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांना हा आदेश लागू आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी, चिकोडी जिल्हा शिक्षणाधिकारी आणि दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांच्या पदवीपूर्वी शिक्षणाधिकार्यांनी करावी, असेही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आदेशात म्हटले आहे. पूर्ण बेळगाव जिल्ह्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा, पदवीपूर्व महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी राहणार आहे. संततधार पावसामुळे सोमवारी, मंगळवारीही सुट्टी देण्यात आली होती. बुधवारी सलग तिसर्या दिवशीही सुट्टी राहणार आहे.