

खानापूर : खानापूर-रामनगर महामार्गावरील गुंजी ते कामतगा क्रॉस यादरम्यान पुलावरील रस्त्याचे सदोषपूर्ण काम करण्यात आले आहे. पूल व रस्ता जोडणार्या ठिकाणी तशीच सोडण्यात आलेली चर आणि गतिरोधकसदृश उंचवटासारख्या अडथळ्यांमुळे गेल्या आठ दिवसांत चार वाहने पलटी झाली आहेत. त्यामुळे संतप्त वाहन चालकांनी महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदाराच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची हालचाल सुरू केली आहे.
होनकल क्रॉस ते रामनगरपर्यंतच्या मार्गावर शेतवडी व जंगलातून वाहणार्या नाल्यांच्या ठिकाणी पुलांची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी पूल व रस्ता जोडताना ते सारख्याच उंचीचे असतील याची दक्षता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे गतिरोधकसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गोलाकार वळणामुळे उंच व सखल जागेचा अंदाज येत नसल्याने चालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात घडत आहेत.
आठ दिवसांत तीन ट्रक व एक कारचा गंभीर अपघात झाला आहे. यामध्ये जीवितहानी झालेली नसली तरी वाहनांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत अशा धोकादायक रस्त्यावरून वाहतूक सुरू करून कंत्राटदाराने हलगर्जीपणा दाखवला आहे. शुक्रवारी या ठिकाणी अशाचप्रकारे एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून दोन्ही टायर निखळून पडले. ट्रक रस्त्याकडेला कलंडला. याबाबत अपघातग्रस्त ट्रकचे मालक नामदेव चव्हाण यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी चालवली आहे.
पुलावर अद्याप बाजूपट्टीचे काम झालेले नाही. लोखंडी सळ्या तशाच उघड्या सोडण्यात आल्या आहेत. सलग तीन ते चार ठिकाणी गतिरोधकसदृश उंचवटा असल्याने वेगाने आलेल्या वाहन चालकाला वाहन नियंत्रण करण्यास वेळच मिळत नाही. परिणामी, वाहने रस्ता सोडून खाली पलटी होत आहेत. या ठिकाणी वीस ते पंचवीस फूट खोल खड्डा असून त्यात वाहन पडल्यास चालकांच्या जीवावर बेतू शकते. खानापूर पोलिसांनी कंत्राटदार व अभियंत्याला येथील रस्त्याचे काम पूर्ण करून पुरेशी सुरक्षा यंत्रणा उपलब्ध करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.