

कुसमळी : पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे.
खानापूर : बेळगाव-चोर्ला मार्गावरील कुसमळी पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. काँक्रिट घट्ट होण्यास आणखी 15 दिवसांचा कालावधी लागणार असून 1 जुलैपासून पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश खुला केला जाणार आहे.
दुचाकी व चारचाकी वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी चार दिवसांत लहान वाहनांना प्रवेश सुरू केला जाणार आहे.
बेळगाव-गोवा रस्त्यावरील कुसमळीतील मलप्रभा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल जीर्ण व धोकादायक बनला होता. येथून अवजड वाहनांची वाहतूक होताना पुलाला हादरे बसत होते. त्यामुळे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चोर्ला रस्त्याच्या विकासाबरोबरच कुसमळी पुलाच्या पुन:निर्माणाचे काम हाती घेण्यात आले. ब्रिटिशकालीन जुना पुल काढून त्याच ठिकाणी नवीन पूल उभारण्यात आला आहे. हा पूल 90 मी. लांब तर साडेपाच मीटर रुंद आहे. नवीन पुलाचे काम हाती घेण्यापूर्वी नदीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी मातीचा भराव टाकून दहा पाईप घालून वाहतुकीसाठी पर्यायी पुल व रस्ता बनवण्यात आला होता. तथापि गेल्या 20 दिवसांत हा पूल आणि रस्ता तीनवेळा वाहून गेला आहे. त्यामुळे, नव्या पुलावरून वाहतूक त्वरित सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती.
मलप्रभा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाला फेब्रुवारीमध्ये सुरुवात करण्यात आली होती. मे अखेरपर्यंत नवीन पुलाचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराने घेतली होती. तथापि संथ कामामुळे तब्बल दीड महिना विलंब झाला आहे. 1 जुलैपासून बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.
कुसमळी रस्ता बंद झाल्याने सर्व प्रकारच्या वाहनांना खानापूर-जांबोटी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यामुळे, दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहेत. लहान प्रवासी वाहनांना कुसमळी पुलावरुन चार दिवसात प्रवेश सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली असून मातीचा भराव घालून खडी घालण्याचे काम जोमाने सुरू आहे.