

बेळगाव ः गेल्या वर्षभरात सर्वाधिक ऑनलाईन फसवणूक झालेल्या राज्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यात कर्नाटक देशातील दुसरे सर्वाधिक फसवणूक झालेले राज्य ठरले आहे. वर्षभरात 2,13,228 गुन्हे दाखल झाले असून 2,413 कोटी फसवणूक झालेली रक्कम आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीच्या यादीत महाराष्ट्र नंबर वनवर आहे.
शेअर मार्केटमध्ये जादा नफ्याचे आमिष, डिजिटल अरेस्टची भीती, गॅस कनेक्शनसह विविध कंपन्यांचे तसेच बँक खाते बंद करण्याची धमकी, स्पीड पोस्टद्वारे पार्सल आल्याचे सांगत फसवणूक, एपीके फाईलची लिंक ओपन करण्यास सांगणे, अशा अनेक प्रकारे ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यांचे कारनामे दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. ऑनलाईन फसवणूक झालेल्या देशातील टॉप फाईव्ह राज्यांची यादी समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या तर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर तामिळनाडू, उत्तर प्रदेश व तेलंगणाचा क्रमांक लागतो.
2025 मध्ये कर्नाटकात दोन लाखांवर फिर्यादी दाखल झाल्या असून अडीच हजार कोटींची फसवणूक झाली आहे. महाराष्ट्रात 2 लाख 83 हजार 320 फिर्यादी दाखल असून 3,203 कोटींची फसवणूक झाली आहे. नवीन वर्षाची सुरवात झाल्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसांत राज्यभरात कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे.
2 जानेवारी रोजी कारवार जिल्ह्यातील मुंदगोड येथील 72 वर्षाच्या वृद्धाला डिजिटल अरेस्टची भिती दाखवत त्यांच्या खात्यावरील 1 कोटी 61 लाखांची फसवणूक केली आहे. भामट्यांनी या वृद्धाच्या फोटोसोबत एका महिलेचा फोटो जोडून डिजिटल अरेस्टची भिती दाखवल्याचे तपासात नमूद केले आहे. बिदरमधील भाजपच्या एका माजी आमदारालाही डिजिटल अरेस्टची भीती दाखवत 2025 मध्ये 31 लाख लाटण्यात आले होते. हॉटेल, कंपनीला स्टार द्या, असे म्हणत लुटण्याची पद्धत अलीकडे अधिक रुढ होताना दिसत आहे.
सर्वात मोठी फसवणूक 32 कोटींची
राज्यात वर्षभरात घडलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये सर्वात मोठी फसवणूक एका महिलेची झाल्याची नोंद आहे. सप्टेंबर 2025 मध्ये सदर महिलेला डिजिटल अरेस्टची सतत भीती दाखवून तिच्या खात्यावरील तब्बल 31 कोटी 81 लाख रुपये भामट्यांनी वर्ग करून घेतले होते. तिला आरबीआय व सीबीआयची धमकी दाखवत आर्थिक लूट केली होती.
अबब... काय हे आकडे
वर्षात देशभरातील डिजिटल फिर्यादी ः 21,77,524
वर्षभरात फसवणुकीची रक्कम ः 19,812 कोटी
सहा वर्षांत फसवणुकीची रक्कम ः 52,976 कोटी