

बंगळूर ः राज्यातील कथित भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध लोकायुक्तांचे छापे सुरूच आहेत. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. 23) सकाळी कारवार, बागलकोट, विजापूर आणि रायचूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापे टाकले. दिवसभर त्यांचे शोधकार्य सुरू होते. या छाप्यांत मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचा अंदाज आहे.
बागलकोटमधील जिल्हा पंचायतीचे सहायक सचिव श्यामसुंदर कांबळे, विजापूरमधील कृषी संचालक मल्लप्पा हनमंतप्पा यरझरी, कारवार जिल्ह्यातील सिद्धापूरमध्ये शिरसी ग्राम सेवा सहकारी संघ लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारुती यशवंत माळवी, रायचूरमधील ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याच्या सहायक कार्यकारी अभियंता विजयालक्ष्मी यांच्या घरांवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे टाकले. श्यामसुंदर कांबळे यांच्या बागलकोट आणि गदग जिल्ह्यातील नरगुंद येथील घरांवर छापे टाकून तपासणी करण्यात आली. लोकायुक्तांनी त्याच जिल्ह्यातील मल्लप्पा यांच्या घरावरही छापे टाकले. कारवार जिल्ह्यातील सिद्धापूरमध्ये मारुती माळवी यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. रायचूर जिल्ह्यात विजयालक्ष्मी यांच्या घरावर छापा टाकून झडती घेण्यात आली.
लोकायुक्त छाप्यात चिक्कजला पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवण्णा लोकायुक्त सापळ्यात अडकले आहेत. त्यांना रात्री एका प्रकरणासंदर्भात 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. लोकायुक्तांनी शिवण्णा यांना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.
अडीच कोटींची बेकायदा मालमत्ता उघडकीस?
बसवण बागेवाडीतील (जि. विजापूर) कृषी खात्याचे सहायक संचालक मल्लप्पा यरझरी यांच्या विविध ठिकाणच्या निवासस्थानांवर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकून 2 कोटी 50 लाख रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता उघडकीस आली आहे. ज्ञात उत्पन्न स्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता संपादन केल्याची माहिती मिळाल्याच्या आधारे त्यांच्याविरोधात विजापूर लोकायुक्त पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर न्यायालयाकडून वॉरंट प्राप्त करुन मंगळवारी सकाळी यरझरी यांचे विजापूर शहरातील नवरसपूरमधील निवासस्थान, कनकाल गावातील फार्महाऊस, मुद्देबिहाळ शहरातील मामाच्या घरी तसेच त्यांच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत सुमारे 29,42,000 रुपये, सोन्या-चांदीचे दागिने, वाहने तसेच इतर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी सुमारे 2.50 कोटींची बेकायदेशीर मालमत्ता संपादन केल्याचे उघडकीस आले आहे.
ही कारवाई विजापूरचे लोकायुक्त पोलिस अधीक्षक टी. मल्लेश यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लिकार्जुन तुळसीगेरी, डीएसपी बी. एस. पाटील, डीएसपी तसेच पोलिस निरीक्षक आनंद टक्कण्णावर, आनंद डोणी, निंगप्पा पुजारी, संगमनाथ होसमणी आणि कर्नाटक लोकायुक्त, विजापूर व बेळगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.