

बेळगाव : ग्राम पंचायत नोकर संघातर्फे विविध मागण्यांसाठी दि. 20 पासून बेमुदत आंदोलन हाती घेण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातील कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान एका आंदोलकाचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. राज्य मुख्य सचिवांनी ठोस आश्वासन दिल्याने सोमवारी आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनामध्ये बेळगाव जिल्ह्यातील ग्रा. पं. कामगार सहभागी झाले असून आंदोलनामध्ये ग्राम पंचायत क्लार्क, वॉटरमॅन, बिल कलेक्टर आदींचा सहभाग होता. बेळगावात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आमदारांना ग्रा. पं. कर्मचारी संघातर्फे निवेदन देण्यात आले होते. अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या समस्या उपस्थित करण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु त्यावर कोणत्याही आमदाराने आवाज उठविला नाही. यामुळे बेमुदत आंदोलन करण्यात आले.
ग्राम पंचायत नोकर संघाकडून प्रामुख्याने महागाई वाढीच्या आधारावर किमान वेतन 36 हजार रुपये देण्यात यावे. 1 लाख, 20 हजार रुपयापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे बीपीएल कार्ड रद्द करु नये. किमान मासिक वेतन 36 हजार रुपये करुन त्यानुसार बीपीएल कार्डसाठी उत्पन्नाची मर्यादा वाढवावी. सेवा ज्येष्ठतेनुसार वेतन देण्यात यावे. स्वच्छवाहिनी नोकरांना पंचायत नोकर म्हणून मान्यता द्यावी. डाटा एन्ट्री ऑपरेटरची नेमणूक करावी. प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये द्वितीय दर्जाचे हिशेब सहाय्यक पद मंजूर करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येईल, वेतनवाढीचा निर्णय मार्चपर्यंत घेण्यात येईल. कायमस्वरुपी नेमणुकीचे आदेश बुधवारी देण्यात येतील, अशी आश्वासने मुख्य सचिवांनी दिली. यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.